सलमान खानचा चित्रपट बजरंगी भाईजानच्या यशस्वीतेमध्ये पाकिस्तानची मूकी मुलगी शाहिदाचे पात्र साकारणाऱ्या हर्षिता मल्होत्राचे मोठे योगदान होते. मूक मुलीची भूमिका तिने इतक्या सुंंदरपणे साकारली की, ती थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडली. या आधीही हिंदी चित्रपटात मूक व्यक्तीची भूमिका भाव खाऊन गेली आहे. अशा भूमिकांची चर्चा निघते, तेव्हा गुलजार यांचा ‘कोशीश’ हा चित्रपट आठवतो. यात संजीव कुमार आणि जया बच्चन दोघांनीही मूकबधीर पती-पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी संजीव कुमार यांना बेस्ट हीरोचे नॅशनल अॅवॉर्ड, तर गुलजार यांना बेस्ट स्क्रीनप्लेचा नॅशनल अॅवॉर्ड मिळाले होते. ८० च्या दशकात पहिल्यांदा फिल्म प्रॉडक्शनमध्ये येत गोविंदाने हॉलीवूडचा चित्रपट आईविटनेसचा रिमेक हत्या या शीर्षकाने बनवला. यात एक मूक बालक एका खुनाचा प्रत्यक्षदर्शी असतो. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी झाला आणि मूक बालकाची भूमिका करणाऱ्या मास्टर राजाचेही मोठे कौतुक झाले. संजय लीला भंसाळी यांचा पहिला चित्रपट खामोशी द म्युजिकलमध्ये नाना पाटेकर आणि सीमा बिस्वास यांनी मूकबधीर पती-पत्नीची भूमिका केली. ज्यात मनिषा कोईरालाने त्यांच्या मुलीची भूमिका निभावली होती. ब्लॅकमध्ये राणी मुखर्जीने मूक युवती अगदी जोरदार उभी केली. राणीला यासाठी बेस्ट नायिकेचे फिल्मफेयर मिळाले होते. श्रेयस तळपदेने इकबाल चित्रपटात मूक युवकाचा रोल केला होता. इकबालला त्या वर्षीचा बेस्ट चित्रपटाचा नॅशनल अॅवॉर्ड मिळाले होते.
मूक पात्रांचा हृदयस्पर्शी संवाद
By admin | Updated: January 6, 2016 01:25 IST