Join us  

लकी अली यांना जिवंतपणीच चाहत्यांनी वाहिली श्रध्दांजली, निधनाची बातमी निव्वळ अफवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 12:25 PM

लकी अली यांच्या निधनाची बातमी वाचून त्यांची खास मैत्रीण आणि मॉडेल नफीसा अली यांनाही धक्काच बसला.

कोरोना काळात अनेक दिग्गज कलाकारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशात सोशल मीडियावर कलाकारांच्या मृत्यूच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल अशी बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसतो.मात्र कोणत्याही बातमीची शहानिशा न करता सोशल मीडियावर कलाकारांच्या निधनाची बातमीवर चाहतेही विश्वास ठेवत आहेत. 

नुकतेच मीनाक्षी शेषाद्री यांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यानंतर असे काहीही झाले नाही. त्यांच्या कुटुंबासह सुरक्षित असल्याचे समोर आले. त्याचपाठोपाठ आता प्रसिद्ध गायक लकी अली यांच्या निधनाची बातमीने सोशल मीडियावर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.

इतकेच काय तर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली देखील वाहिली. लकी अली यांच्या निधनाची बातमी वाचून त्यांची खास मैत्रीण आणि मॉडेल नफीसा अली यांनाही धक्काच बसला. सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेजेस पाहून लकी अलीच्या निधनाची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. लकी अली सुरक्षित आहेत.कृपया अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका असेही त्यांनी सांगितले आहे. 

ETimes ला दिलेल्या मुलाखतीत नफीसा अली यांनी सांगितले की,  आजच दिवसांतून २ ते ३ वेळा लकी अलीसह माझे फोनवर बोलणे झाले आहे.  त्यांना कोरोनाही झालेला नाहीय. कोरोनामुक्त होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यांच्या शरिरात ऐंटीबॉडीज आहेत. सध्या लकी अली त्यांच्या म्युझिक कॉन्सर्टचे प्लॅनिंग करण्यात व्यस्त आहेत. वर्चुअल कॉन्सर्ट विषयी आम्ही प्लॅनिंग करत आहोत. गेल्या काही दिवसांपासून लकी अली त्यांच्या कुटुंबासह बेंगलुरु येथील फार्महाऊसवर राहात आहेत.नुकतेच माझं बोलणं झाले आहे. कुटुंबासोबत ते सुखरुप आहेत. चिंतेचे कारण नाही. 

लकी अली  एक गायक असण्यासोबतच उत्तम अभिनेताही आहेत.  ‘कांटे’ या सिनेमात त्यांनी अभिनय केला होता. लकी अली यांना अभिनय करताना पाहून चाहतेही आश्चर्यचकीत झाले होते. पण गेल्या काही वर्षांपासून लकी अली बॉलिवूडमध्ये सक्रीय नाही.  इंडस्ट्रीतून जणू ते गायब झाले आहेत. मात्र त्यांचे व्हायरल होणारे व्हिडीओंच्या माध्यमातून ते आजही चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. 

टॅग्स :लकी अलीनफीसा अली