Join us  

सिद्धार्थ जाधवचा ‘आता होऊ दे धिंगाणा २’ घेणार निरोप! अंकुश चौधरीचा नवा रिअ‍ॅलिटी शो येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 3:55 PM

'आता होऊ दे धिंगाणा २' ची जागा 'मी होणार सुपरस्टार–जोडी नंबर १' हा नवा रिअ‍ॅलिटी शो येणार आहे. ९ मार्चपासून हा शो भेटीला येत आहे.

स्टार प्रवाहवर अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सूत्रसंचालन करत असलेला ‘आता होऊ दे धिंगाणा २’  (Ata Hou De Dhingana) रिअ‍ॅलिटी शो सुरू आहे. या शोमध्ये दोन मालिकांच्या टीममधली सांगीतिक लढत पाहायला मिळत आहे. पण लवकरच हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता होऊ दे धिंगाणा २ ची जागा मी होणार सुपरस्टार – जोडी नंबर १ हा नवा रिअ‍ॅलिटी शो येणार आहे. ९ मार्चपासून हा शो भेटीला येत आहे. 

‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ शोच्या आधीच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलाय. त्यामुळे नव्या पर्वाची उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करणार आहेत. आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकला या मंचावर पहाता येणार आहे. त्यामुळे या पर्वात मंचावर नृत्यासोबतच नात्यांमधली गंमतही अनुभवता येणार आहे.

मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाच्या सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे सुपरस्टार अंकुश चौधरी. तर लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. मराठी सिनेमांमध्ये आपल्या जबरदस्त नृत्यदिग्दर्शनाने वेगळी ओळख निर्माण करणारी सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि हिंदी-मराठी रिऍलिटी शो गाजवणारा नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत.

दोन्ही पर्वांना मिळालं भरभरुन प्रेम

या शोविषयी अंकुश चौधरी म्हणाला, मी होणार सुपरस्टारचं प्रत्येक पर्व हे वेगळेपण घेऊन येत आहे. यावेळेच्या पर्वात जोड्यांची धमाल अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे फक्त नृत्यच नाही तर या मंचावर नात्यांचाही खऱ्या अर्थाने सोहळा होईल. पहिल्या दोन्ही पर्वांना भरभरुन प्रेम मिळालं. दोन्ही पर्वातल्या स्पर्धकांच्या मी अजूनही संपर्कात आहे. त्यामुळे या मंचाने मला नवा परिवार दिलाय असं म्हणू शकतो. या पर्वातही नवनव्या स्पर्धकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवअंकुश चौधरी