‘अवघाची संसार’ या मालिकेत अभिनेत्री अमृता सुभाषने प्रमुख भूमिका साकारली होती. ही मालिका करत असताना प्रेक्षक एखाद्या मालिकेत किती गुंतलेले असतात, याची जाणीव तिला झाली होती. आता तिच्या ‘आयलंड सिटी’ या आगामी चित्रपटात ती मालिकेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या एका फॅनची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाविषयी तिने ‘लोकमत सीएनएक्स’सोबत मारलेल्या दिलखुलास गप्पा...‘आयलंड सिटी’ हा चित्रपट करताना मालिकेत काम केल्याचा तुला किती फायदा झाला?- मी अवघाची संसार ही मालिका करीत असताना प्रेक्षक मला भेटल्यावर ते माझ्याशी खूप प्रेमाने बोलायचे. मी माझ्या पतीचे इतके कसे ऐकते, त्याला मी का सोडून देत नाही, अशा प्रकारचे प्रश्न मला विचारायचे. यातून प्रेक्षक एखाद्या भूमिकेत किती गुंतलेले असतात, याची जाणीव मला झाली होती. ‘आयलंड सिटी’ या मालिकेत मी अशाच एका फॅनची भूमिका साकारत आहे. ही महिला मालिकेतील पात्रांच्या प्रेमात इतकी पडली आहे, की या मालिकेतील व्यक्तिरेखा या तिच्या कुटुंबातील सदस्य असल्यासारखे ती समजते. मालिकेचे फॅन्स मालिकेत भावनिकरीत्या किती गुंतलेले असतात, याची जाणीव मला अवघाची संसार या मालिकेमुळे झाली असल्याने ही भूमिका साकारणे खूपच सोपे गेले. आयलंड सिटी हा चित्रपट अनेक फेस्टिव्हलमध्ये गाजलेला आहे. फेस्टिव्हमधील सिनेमे हे तिकिटबारीवर तितकी कमाई करीत नाहीत, असे म्हटले जाते. याबद्दल तुला काय वाटते?- ‘किल्ला’ या माझ्या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. फेस्टिव्हलमध्ये गाजलेले अथवा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट होत नाहीत, असे म्हटले जाते. पण, ‘किल्ला’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर प्रचंड गल्ला जमवला. या चित्रपटाचे खूपच चांगल्या रीतीने प्रमोशन करण्यात आले होते. चित्रपटाचे प्रमोशन चांगल्या रीतीने केले गेले तर तो चित्रपट लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचवता येतो. त्यामुळे फेस्टिव्हलमधील चित्रपट हिट होत नाहीत, असे मला वाटत नाही.तुझे बालपण पुण्यात गेले तर आज तू कित्येक वर्षांपासून मुंबईत राहतेस. या दोन्ही शहरांविषयी तुला काय वाटते?- पुण्यात मी लहानाची मोठी झाल्यामुळे पुणे हे शहर माझ्यासाठी नेहमीच खास आहे. या शहराइतकेच आज मुंबईदेखील मला तितकेच जवळचे वाटते. मला आजही आठवते, मी मुंबईला राहायला आले, त्या वेळी दादर स्टेशनला उतरले होते. माझ्यासमोर तीन रस्ते होते. हे तीन रोड पाहिल्यावर यातील कोणत्या रोडवरून मला जायचे, याचा निर्णय मला घ्यायचा होता. माझे करिअरही काहीसे असेच आहे. मी चित्रपट, मालिका, नाटक अशा विविध रस्त्यांवर प्रवास करीत असते. मुंबई हे शहर सगळ्यांना आपलेसे करणारे आहे. या शहरात कधीच कोणाला एकटेपणा वाटू शकत नाही, असे मला वाटते. मुंबईत कधी तरी एखादी अनोळखी व्यक्तीदेखील आपल्याला खूप जवळची वाटते. मी कधी तरी सार्वजनिक वाहनांनी प्रवास करते, त्या वेळी मला हा अनुभव अनेक वेळा येतो. आज तू इतकी वर्षं अभिनय करीत आहेस. माणूस रोज नव्याने काहीतरी शिकत असतो. तुला इतक्या वर्षांत या इंडस्ट्रीने काय शिकवले आहे?- अभिनय करण्याचा विचार मी केला, तेव्हा मला केवळ प्रमुख भूमिका साकारायच्या आहेत, असेच मी ठरवले होते. पण, आज अनेक वर्षांनंतर प्रमुख भूमिका साकारण्यापेक्षा ती भूमिका चित्रपटात किती महत्त्वाची आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे, ही गोष्टी मी शिकले आहे. कोणत्याही चित्रपटासाठी कथा ही सगळ्यात महत्त्वाची असते. मी आज वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहे आणि त्या साकारताना मला खूपच मजा येत आहे. मी आता भूमिकेच्या लांबीपेक्षा चित्रपट भूमिकेला किती महत्त्व आहे, हे पाहते. भूमिका महत्त्वाची असली; पण ती छोटी असली तरी ती स्वीकारते. ‘अस्तू’ या चित्रपटातील माझी भूमिका ही खूपच छोटी आहे; पण तिने मला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आहे. त्यामुळे माझे म्हणणे योग्य आहे, हे यातून सिद्ध झाले.
शॉर्ट बट स्वीट
By admin | Updated: September 10, 2016 02:08 IST