Join us  

"शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना मी चप्पल काढून ठेवायचो, कारण...", शरद केळकरने सांगितली 'तान्हाजी'ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 9:20 AM

Shivjayanti : शरद केळकरला 'अशी' मिळालेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, अभिनेत्याने सांगितला किस्सा

हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे शरद केळकर. अनेक हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून त्याने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. हिंदीबरोबरच अनेक मराठी चित्रपटांतही शरद महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसला. पण, त्याने 'तान्हाजी' सिनेमात साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. 

२०२० साली प्रदर्शित झालेल्या ओम राऊतच्या तान्हाजी सिनेमात शरद छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत होता. त्याची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत शरदने शूट सुरू झाल्यावर आदराप्रती चप्पल काढून ठेवत असल्याचं सांगितलं. शरद म्हणाला, "ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतात हिंदवी स्वराज्य निर्माण केलं." पुढे शरदने या भूमिकेसाठी विचारल्यानंतर काय प्रतिक्रिया होती, याबाबतही भाष्य केलं. 

तो म्हणाला, "मी यापूर्वी कधीच ओम राऊतशी बोललो नव्हतो. त्याला भेटलोही नव्हतो. त्याने मला कॉल केला तेव्हा मी भारताबाहेर होतो. त्याने मला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायची आहे. मी दोन मिनिटं शांत बसलो. त्यानंतर मी त्याला 'मीच का?' असं विचारलं. तेव्हा तो म्हणाला की मला वाटतं माझा राजा तुझ्यासारखा दिसावा. आम्ही लूक टेस्ट केली. जेव्हा मी छत्रपती शिवरायांच्या गेट अपमध्ये आलो तेव्हा सगळे माझ्याकडे बघत होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. एक मराठी अभिनेता आणि महाराष्ट्रीयन म्हणून ही भूमिका साकारणं खूप काही आहे." 

"प्रेक्षक जेव्हा या चित्रपटाबद्दल बोलतात तेव्हा माझ्या भूमिकेबद्दलही बोलतात. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझं बालपण मध्य प्रदेशात गेलं. त्यामुळे शाळेच्या पुस्तकात त्यांच्याबद्दल फार कमी माहिती होती. त्यानंतर मी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना शिवाजी महाराजांबद्दल शालेय जीवनात अधिक माहिती देण्यासाठी विनंती केली होती. ज्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल जाणून घेता येईल," असंही शरद केळकर म्हणाला. 

टॅग्स :शरद केळकरतानाजीछत्रपती शिवाजी महाराज