Join us  

शरद पोंक्षेंची लेक पायलट झाली! भावूक होत म्हणाले, "आरक्षण नसताना केवळ..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 2:24 PM

वडिलांचं आजारपण, आर्थिक परिस्थिती यावर मात करत सिद्धी पायलट झाली आहे.

डॉक्टरची मुलं डॉक्टर, इंजिनिअरची मुलं इंजिनिअर, आणि कलाकाराची मुलंही कलाकारच होतात असं चित्र बऱ्याचदा दिसतं. पण घरातून तसा कोणताही वारसा नसताना वेगळंच करिअर निवडणं हे खूप कमी लोकांमध्ये दिसून येतं. आता हेच बघा मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांची लेक सिद्धी पोंक्षे (Siddhi Ponkshe) पायलट झाली आहे. आज त्यांना लेकीचा प्रचंड अभिमान वाटत असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.

शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धीचं लहानपणापासूनच पायलट होण्याचं स्वप्न होतं. आज अखेर ते पूर्ण झालं असून लेकीच्या या यशाचा सर्वात जास्त आनंद वडिलांना होणारच. शरद पोंक्षे यांनी सिद्धीचे फोटो पोस्ट करत लिहिले, 'कु सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. इयत्ता चौथीपासून तिने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून, माझं आजारपण, कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली. बापाला आणखी काय हवं नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तुझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशीलच खात्रीच आहे. लव यू बाळा.'

जुलै महिन्यात त्यांनी सिद्धीला मुंबई विमानतळावर निरोप देतानाचा फोटो पोस्ट केला होता. ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं लिहित त्यांनी सिद्धीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. आता मात्र लेक  पायटल झाल्यानंतर सध्या शरद अभिमानाचा क्षण अनुभवत आहेत. शरद पोंक्षे यांना स्नेह आणि सिद्धी अशी दोन मुलं आहेत. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत स्नेहने नुकतेच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तर सिद्धी आता प्रायव्हेट पायलट बनली आहे.

टॅग्स :शरद पोंक्षेपरिवारवैमानिकमराठी अभिनेता