Join us  

'शाळा' फेम सुजय डहाके 'श्यामची आई'साठी राज्य पातळीवर घेतोय श्यामचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 10:12 PM

Sujay Dhahake: श्यामची भूमिका साकारू शकेल अशा कलाकाराचा महाराष्ट्र राज्य पातळीवर शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.

काही गोष्टी, तसंच साहित्य हे जणू सोनेरी आठवणींचा ठेवाच असतं. 'श्यामची आई' (Shyamchi Aai)ही कथाही यांपैकीच एक आहे. त्यामुळं जेव्हा कधी 'श्यामची आई'चा उल्लेख होतो, तेव्हा क्षणार्धात श्याम आणि त्याच्या आईची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी रहाते. 'शाळा'सारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत दाखल झाल्यानंतर नेहमीच नावीन्यपूर्ण प्रयोग करत मराठी रसिकांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येणारा दिग्दर्शक सुजय डहाके (Sujay Dahake)नं आता 'श्यामची आई' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य उचलल्याचं सर्वांनाच माहित आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या याचीच पूर्वतयारी सुरू असून, सुजय सध्या श्यामचा शोध घेण्यात बिझी आहे.

अमृता अरुण राव यांची निर्मिती असलेल्या 'श्यामची आई'साठी श्यामचा शोध घेण्यासाठी सुजयनं एक शोध मोहिम सुरू केली आहे. श्यामची भूमिका साकारू शकेल अशा कलाकाराचा महाराष्ट्र राज्य पातळीवर शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. यासाठी एक प्रसिद्धी पत्रकही प्रकाशित करण्यात आलं असून, 'श्यामची आई' चित्रपटात टायटल रोल साकारण्यासाठी अभिनयाची आवड असलेल्या ८ ते १२ वर्षे वयोगटातील बालकलाकाराची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यास उत्सुक असणाऱ्या मुलांच्या पालकांनी संपर्क साधण्याचं आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. रुपेरी पडद्यावर श्याम साकारण्यास इच्छुक असलेला मुलगा ८ ते १२ वर्षे वयोगटातील असावा. त्याने स्वतःच एखादा मोनोलॉग मोबाईलवर रेकॉर्ड करून दिलेल्या फोन नंबर आणि ईमेलवर पाठवावा. कोणीही थेट फोन करू नये. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२१ आहे. या तारखेनंतर फोन आणि ईमेल बंद करण्यात येतील. यातून एकूण १० मुलांची निवड केली जाईल. त्यांना मुंबईत आणून, तीन दिवसांची अभिनय कार्यशाळा घेतली जाईल. त्यातून एका मुलाची निवड श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड केली जाईल. निवड झालेल्या मुलांना सुजय आणि त्याच्या टीमकडून संपर्क साधला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. इच्छुक मुलं व पालकांनी shyamchiaai2022@gmail.com आणि ८७७९६२४८२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

'श्यामची आई' चित्रपटाचं शूटिंग होणार ब्लॅक अँड व्हाईटमध्ये 'शाळा', 'फुंतरू', 'आजोबा', 'केसरी' असे एका पेक्षा एक प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणाऱ्या सुजयनं भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत सुजयनं १५ ऑगस्ट रोजी पोस्टर रिलीजच्या माध्यमातून 'श्यामची आई' या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'श्यामची आई' हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवर आधारित असेल. यंदाचं वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीचं आहे. अमृता अरुण राव यांची निर्मिती असलेला 'श्यामची आई' हा चित्रपट पुढल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे. या चित्रपटाचं शूटिंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यात येणार आहे.

टॅग्स :सुजय डहाके