Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखमुळे झाला प्रसिद्ध; लोकप्रियता मिळताच इब्राहिमने वळवली किंग खानकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 13:25 IST

Ibrahim qadri : शाहरुखने बोलावलं तरच जाईन, असं म्हणत इब्राहिमने किंग खानला स्वत:हून भेटणार नसल्याचं म्हटलं आहे.

इब्राहिम कादरी हे नाव अनेकांना ठावूक असेल. शाहरुख खानचा ड्युप्लिकेट म्हणून त्याने तुफान लोकप्रियता मिळवली. 2017 पर्यंत इब्राहिम गुजरातमधील जुनागढ येथे भिंतीवर पोस्टर, होर्डिंग्स पेंट करत होता. परंतु, एका गोष्टीने त्याचं नशीब पालटलं आणि तो आज देशासह विदेशातही लोकप्रिय झाला. शाहरुखचा ड्युप्लिकेट म्हणून आज तो अनेक ठिकाणी वेगवेगळे शो करतो. विशेष म्हणजे त्याची स्टोरी कोणत्याही फ्लिमी स्टोरीपेक्षा वेगळी नाही. परंतु, शाहरुखमुळे लोकप्रिय झालेल्या इब्राहिमने आज किंग खानला न भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शाहरुखला कधीच भेटणार नाही असं त्याने एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

इब्राहिमने 'हिंदुस्तान टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने किंग खानविषयी भाष्य केलं. "सुरुवातीच्या काळात मी या गोष्टीकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही. परंतु, लोकप्रियता आणि यश मिळायला लागल्यावर मी याकडे सिरीअसली पाहायला लागलो. पूर्वी मी केवळ १० टक्केच त्यांच्यासारखा दिसायचो. मात्र, आता मी माझा फिटनेस, केसांची स्टाइल, देहबोली यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं आणि त्यानुसार स्वत:मध्ये बदल केले. त्यामुळे आता कुठे मी त्यांच्यासारखा ३० टक्के दिसायला लागलो आहे असं म्हणू शकतो. पण, हा प्रवास बराच लांबचा आहे", असं इब्राहिम म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "जर शाहरुखने मला भेटायला बोलावलं तर मी नक्कीच जाईन. पण न बोलावता मी स्वत:हून नाही जाणार. कारण, जर मी असं केलं तर माझी क्रेझ कमी होईल आणि माझ्यातला जोश सुद्धा. जोपर्यंत आपल्याकडे फरारी नसते तोपर्यंत आपल्यात तिची क्रेझ असते. पण, ती आपल्याकडे आल्यानंतर ती गॅरेजमध्ये पडून राहते. तिची क्रेझ कमी होते. त्यामुळेच मी शाहरुख खान यांना भेटायला जाणार नाही."

दरम्यान, आज जगभरातून अनेक ठिकाणी इब्राहिमला शोसाठी आमंत्रित करण्यात येतं. कधी दुबई, तर कधी मस्कत अशा अनेक ठिकाणी तो कार्यक्रम करतो. विशेष म्हणजे आता त्याला लोकांमध्ये वावरणं कठीण होतं. लोक त्यांच्यावर प्रेम करतात. मात्र, दैनंदिन काम करताना त्यांना अनेक अडचणी येतात. दुकानदारदेखील त्याला खरा शाहरुख समजून त्याच्याकडून जास्त पैशांची मागणी करतात. त्यामुळे आपल्या कृतीमुळे कुठेही शाहरुखच्या इमेजला धक्का पोहचणार नाही याची वेळोवेळी काळजी घ्यावी लागते असंही तो म्हणाला.

टॅग्स :बॉलिवूडशाहरुख खानसेलिब्रिटी