मुंबई - संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार ठरलेले संगीतकार शंकर जयकिशन यांच्या नावाने प्रथमच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ज्येष्ठ गीतकार हसरत जयपूरी यांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
'स्वरमुग्धा आर्ट्स' या संस्थेतर्फे २५ मे रोजी शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यामध्ये जयपुरी यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. शंकर जयकिशन यांच्या ऋणातून उतराई होण्याच्या हेतूने या वर्षापासून त्यांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हसरत जयपुरी यांनी शंकर जयकिशन यांच्या १४२ चित्रपटांसाठी ५१८ गाणी लिहिली आहेत. हसरत जयपुरी यांचे ज्येष्ठ पुत्र अख्तर जयपुरी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
या कार्यक्रमाचे मुख्य निमित्त म्हणजे २०२४ हे राज कपूर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याशिवाय शंकर जयकिशन, शैलेंद्र, हसरत यांच्या कारकिर्दिiची सुरुवात करणाऱ्या राज कपूर यांच्या 'बरसात' चित्रपटाला ७५ वर्षे झाली आहेत. त्या निमित्त शिवाजी मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात शंकर जयकिशन यांची गाणी सादर केली जाणार आहेत. याशिवाय दृकश्राव्य माध्यमातून त्यांच्या काही आठवणी पडद्यावर देखील दाखवल्या जाणार आहेत. गायक-कलाकार संगीता मेळेकर, सर्वेश मिश्रा, आनंद बहेल, माधुरी विल्सन आणि किरण शेंबेकर यात सहभागी होणार आहेत. निवेदक परेश दाभोळकर असून, संगीत संयोजक अजय मदन आहेत.
छबिलदास शाळेचे माजी विद्यार्थी वसंत खेर, कृष्णकुमार गावंड आणि श्रीकांत कुलकर्णी यांनी १९७६ साली 'सिंफनी' नावाची संस्था स्थापन केली होती. त्यावेळी 'याद-ए- शंकर जयकिशन' या कार्यक्रमाचा शुभारंभ षण्मुखानंद हॉल येथे झाला होता. याप्रसंगी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी खुद्द संगीतकार शंकरजी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे ५००हून अधिक प्रयोग भारतभर करण्यात आले. सिंफनी संस्थेने गेल्या त्यानंतर २०-२५ वर्षांमध्ये 'झपाटा', 'मंगल गाणी दंगल गाणी', 'भले तरी देऊ'सारखे कार्यक्रम सादर केले. यात गायक किरण शेंबेकर यांचेही योगदान आहे.