- संजीव वेलणकर
पुणे, दि. १३ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार उर्फ दादामुनींची आज (१३ ऑक्टोबर) जयंती.
आजच्या दिवसाचा दुर्दैवी योगायोग म्हणजे आजच्याच दिवशी अशोक कुमार यांचे धाकटे बंधू आणि विख्यात अभिनेते किशोर कुमार यांची पुण्यतिथी असते.
अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ साली झाला. १९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्यान या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही. दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे. शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले. अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे मा.अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे.
१० डिसेंबर २००१ रोजी त्यांचे निधन झाले. लोकमत समूहातर्फे मा. अशोक कुमार यांना आदरांजली.