Join us  

संजय खान यांनी दोनदा दिला मृत्यूला चकवा, एकदा आगीत होरपळले तर एकदा हेलिकॉप्टर क्रॅश झाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2021 1:21 PM

हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा अनेक भूमिका वठवणारे संजय खान यांचा आज वाढदिवस.

ठळक मुद्देसंजय खान हे अभिनेता हृतिक रोशन सासरे आहेत. संजय खानची मुलगी सुझान खानसोबत हृतिकचे लग्न झाले होते. पण दोघांचा घटस्फोट झाला.

हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते अशा अनेक भूमिका वठवणारे संजय खान यांचा आज (3 जानेवारी) वाढदिवस.  संजय खान यांनी 1964 मध्ये ‘हकीकत’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरुवात केली. यानंतरच्या तीन दशकांच्या करिअरमध्ये संजय खान यांनी सुमारे 30 चित्रपटांत काम केले. सिनेमांशिवाय त्यांनी काही मालिकांमध्येही काम केले. यापैकीच एक गाजलेली मालिका म्हणजे, ‘द स्वॉर्ड आॅफ टीपू सुल्तान’. या मालिकेत संजय खान मुख्य भूमिकेत होते. त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या या मालिकेच्या सेटवर एक गंभीर अपघात झाला होता. संजय खान या अपघातातून थोडक्यात बचावले होते.

दिवस होता 8 फेबु्रवारी 1990. टीपू सुल्तान या मालिकेचे शूटींग सुरु होते. अचानक सेटवर आग लागली. यावेळी सेटवर 40 लोक हजर होते. या आगीत संजय खान यांचे शरीर गंभीरपणे होरपळले होते. ते 65 टक्के भाजले होते. जखमी अवस्थेत संजय खान यांना रूग्णालयात हलवण्यात आले. यानंतर 13 दिवसांत त्यांच्यावर 73 शस्त्रक्रिया झाल्या होत्या.

एका मुलाखतीत संजय खान यांनी या अपघाताबद्दल सांगितले होते. ‘असे काही इतके भीषण घडेल,याची कल्पनाही आम्हाला नव्हती. मी आमच्या लेखकासोबत स्टुडिओ बाहेर असताना आग लागल्याचे आम्हाला कळले. आम्ही पोहोचलो तेव्हा सगळीकडे आगीचे लोट होते. मी जोरात आरेडला आणि दरवाजा उघडला. याचदरम्यान माझ्या डोक्यावर काहीतरी जोरात आदळले. यानंतर काय झाले हे सगळ्यांनाच ठाऊक आहे,’ असे त्यांनी सांगितले होते.

या अपघातानंतर डॉक्टरांनी संजय खान यांना अभिनय सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र संजय खान यातून लवकरच बरे झालेत. यानंतर आपल्या लहान भावासोबत त्यांनी प्रॉडक्शन हाऊसचे काम सांभाळले.त्याआधी संजय खान एका हेलिकॉप्टर दुर्घटनेतून असेच थोडक्यात बचावले होते. 2003 साली त्यांचे हेलिकॉप्टर अनेक फूट उंचीवरून खाली कोसळले होते. म्हैसूरमध्ये ही घटना घडली होती. या दुर्घटनेतून संजय खान अगदी थोडक्यात बचावले होते. 

संजय खान यांनी हॉटेलमध्ये केली होती झीनत अमानला  मारहाण...!

टॅग्स :संजय खान