Join us  

'दबंग'साठी सलमान नव्हता पहिली पसंत, चुलबुल पांडेसाठी 'या' अभिनेत्यांची नावं होती चर्चेत; अरबाजचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 1:13 PM

'दबंग'मधील चुलबुल पांडे या व्यक्तिरेखेसाठी सलमान पहिली पसंत नव्हता. अरबाज खानने याबाबत नुकताच खुलासा केला आहे. 

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या हटके अंदाजाने सगळ्यांना वेड लावतो. 'दबंग' चित्रपटात तो दमदार पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातील त्याची चुलबुल पांडे ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. २०१० साली प्रदर्शित झालेल्या 'दबंग' चित्रपटात सलमानबरोबर सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होती. 'दबंग' सुपरहिट ठरल्यानंतर या सिनेमाचे सिक्वेलही प्रदर्शित करण्यात आले. 'दबंग २' आणि 'दबंग ३'नेही प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. पण, तुम्हाला माहितीये का, 'दबंग'मधील चुलबुल पांडे या व्यक्तिरेखेसाठी सलमान पहिली पसंत नव्हता. अरबाज खानने याबाबत नुकताच खुलासा केला आहे. 

'दबंग'चे दिग्दर्शक अभिनव कश्यप चुलबुल पांडेच्या भूमिकेसाठी इरफान खान किंवा रणदीप हुड्डा यांना कास्ट करणार होते. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला, "अभिनव यांनी मला स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा मी त्यांना मुख्य भूमिकेसाठी कोणाला घेणार, याबाबत विचारलं होतं. मला या भूमिकेची ऑफर का देत नाही, असंही विचारलं. मला त्यांनी चुलबुलऐवजी मक्खीच्या भूमिकेत बघितलं होतं." 

"दिग्दर्शकाला या भूमिकेसाठी इरफान खान किंवा रणदीप हुड्डाला कास्ट करायचं होतं. पण, त्या दोघांपैकी कुणीही या रोलसाठी होकार दर्शवला नाही. त्यानंतर मी त्यांना चित्रपटाच्या निर्मितीबाबत विचारताच चुलबुल पांडेच्या भूमिकेसाठी सलमानचं नाव सुचवलं. सलमानचं नाव ऐकताच त्यांची उत्सुकता वाढली होती, " असंही अरबाज पुढे म्हणाला. 

'दबंग' चित्रपटातील सलमानची चुलबुल पांडे ही भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती. या चित्रपटात सलमानबरोबर सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, डिंपल कपाडिया, विनोद खन्ना, महेश मांजरेकर हे कलाकारही मुख्य भूमिकेत होते. 

टॅग्स :सलमान खानदबंग 3अरबाज खान