ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - कपूर घराण्यातील पुढची पिढी, एक नामवंत अभिनेत्री असलेली करीना कपूर लवकरच आई बनणार आहे. गरदोरपणाच्या काळाताही घरात बसून न राहत काम करण्यावर करीनाचा भर असून ती अनेक जाहिरातींमध्येही झळकताना दिसते. आपले बाळ हे आपल्यासारखेच व्हावे असे सर्व पालकांना वाटते, करीना मात्र याला अपवाद आहे. अभिनेत्री नेहा धुपियाच्या चॅट शो मध्ये करीनानेच हा खुलासा केला आहे. अभिनेता आणि पती सैफ अली खानची एक अशी वाईट सवय आहे जी करीनाला आवडत नाही आणि आपल्या बाळामध्ये ती सवय बिलकूल नसू दे अशीच प्रार्थना ती सतत करत असते.
ऐकून धक्का बसला ना? पण 'नो फिल्टर नेहा' या शोमध्ये बोलताना करीनाने सैफच्या वाईट सवयीचे गुपित फोडले आणि ती सवय म्हणजे त्याचा झोपाळूपणा. ' सैफ खूप झोपतो, तो दिवसातील १८-१८ तास झोपू शकतो, तेही कुंभकर्णाप्रमाणे.. इतका वेळ झोपणं म्हणजे वेळेचा अपव्यय केल्यासारखं आहे, असं मला वाटतं. मी तर सकाळी लवकरच उठते आणि तो दुपारपर्यंत ढाराढूर झोपलेला असतो, त्याची ही सवय माझ्यासाठी खूपच त्रासदायक आहे' असे करीना म्हणाली.
एवढेच नव्हे तरी तिने तिच्या वाईट सवयीबद्दलही भाष्य केले. ' मी तशी कणखर आणि लढणारी आहे. पण मला काळजी करण्यासाची खूप वाईट सवय आहे. पण मला असं वाटतं की कन्या राशीचे सगळे लोक असेच असतात. आम्हाला अतिशय लहान-लाहन गोष्टींची, बाबींची चिंता सतावत असते. ज्या कधीही घडणार नाही, अशा गोष्टींचीही आम्ही कधीतरी चिंता करतो, त्याबद्दलच विचार करत बसतो. या सवयीमुळे माझा मलाच खूप त्रास करतो' असे करीनाने स्पष्ट केले.
येत्या डिसेंबर महिन्यात करीना आणि सैफच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.