Join us  

'मुलीचा जन्म किचनमध्ये काम करण्यासाठीच...' ऋतुजा बागवेने शेअर केला आईचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:15 AM

माझ्या एका मित्राने मला सांगितलं की तुझ्या आईला थँक यू म्हणायचंय. मी विचारलं का? तर म्हणाला....

मुलीचा जन्म केवळ किचनमध्ये काम करण्यासाठीच असतो हा समज आता हळूहळू पुसत चालला आहे. मुलगी शिकत आहे, प्रगती करत आहे, नोकरी व्यवसाय आणि कुटुंब अगदी यशस्वीपणे सांभाळत आहे. पण तरीही किचनमधलं काम हे तिच्या पाचवीलाच पूजलं आहे असा अनेकांचा आजही समज असतो. मुलीने कितीही यश कमवलं तरी पुढच्या क्षणी तिने स्वयंपाकघरात जाऊन काम करणं अपेक्षित असतं. अगदी घरातूनच तिला हे सगळं करायला सांगितलं जातं. पण मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने (Rutuja Bagwe) तिच्या आईचा एक अनोखा किस्सा शेअर केलाय.

ऋतुजाने एका मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ऋतुजा म्हणाली, 'माझ्या एका मित्राने मला सांगितलं की तुझ्या आईला थँक यू म्हणायचंय. मी विचारलं का? तर म्हणाला काही वर्षांपूर्वी एकांकिका करत असताना मी तुझ्या आईला म्हणालो होतो की काय काकू ही एकांकिका करत फिरत असते जरा तिला किचनमध्ये काम करायला सांगा. तेव्हा तुझी आई म्हणाली, माझ्या मुलीचा जन्म फक्त किचनमध्ये काम करण्यासाठी झालेला नाही.'

मित्र पुढे म्हणाला, 'आज मला मुलगी झाली आहे. परवा माझी मुलगी रांगत रांगत किचनकडे गेली. तर माझी आई सहज म्हणाली ह्म्म्म्...मुलगी किचनकडेच जाणार. तेव्हा आपसूकच त्याच्या तोंडून आलं की माझ्या मुलीचा जन्म फक्त किचनमध्ये काम करण्यासाठीच झालेला नाही.'

ऋतुजा म्हणाली, 'हे संस्कार माझ्या आईने केवळ माझ्यावरच नाही तर नकळत माझ्या मित्र मैत्रिणींवरही केले आहेत. हा न सांगता दिलेला पाठिंबा किती गरजेचा असतो यावरुनच कळतं की तिने मला कसं आणि काय घडवलं आहे.'

ऋतुजाला आईविषयी हे सांगताना खूपच अभिमान वाटत होता. 'नांदा सौख्य भरे' मालिकेतून ऋतुजाने अभिनयाला सुरुवात केली. तसंच तिने अनेक एकांकिका स्पर्धेत भाग घेतला आहे. याशिवाय तिने केलेले 'अनन्या' हे नाटक प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडले. 

टॅग्स :ऋतुजा बागवेमराठी अभिनेतापरिवार