Join us  

Sonchiriya Movie Review: मनात घर करणारा सोनचिडिया

By प्राजक्ता चिटणीस | Published: March 01, 2019 2:50 PM

सोनचिडिया या चित्रपटात सुशांत सिंग रजपूत, रणवीर शौरी, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा आणि मनोज वाजपेयी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ठळक मुद्देदिग्दर्शकाने चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा खूप चांगल्या प्रकारे मांडल्या आहेत आणि त्याचमुळे त्या व्यक्तिरेखा या खऱ्या आयुष्यातील वाटतात आणि नकळतपणे आपल्या मनात यांच्याविषयी सहानभूती निर्माण होते आणि चित्रपटात पुढे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचते
Release Date: March 01, 2019Language: हिंदी
Cast: सुशांत सिंग रजपूत, रणवीर शौरी, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा आणि मनोज वाजपेयी
Producer: रॉनी स्क्रूवालाDirector: अभिषेक चौबे
Duration: 2 तास 26 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

बँडिट क्वीन, पान सिंग तोमर यांसारखे अनेक चित्रपट आजवर दरेडेखोर आणि त्यांच्या आयुष्यावर बनवण्यात आलेले आहेत. पण या सगळ्यात सोनचिडिया हा चित्रपट वेगळा ठरतो. कारण या चित्रपटात दरोडेखोरांच्या आयुष्यासोबतच जातीप्रथा, स्त्रियांवर होत असलेले अत्याचार यांसारखे वेगवेगळे विषय हाताळण्यात आलेले आहेत.

मान सिंग (मनोज वाजपेयी) हा कुख्यात दरोडेखोर असतो. पण तो आपल्या शब्दाला जाणणारा आणि आपली मदत कोणी केली तर त्याची परतफेड करण्यासाठी काहीही करणारा असतो. त्याच्याच टोळीत लखना (सुशांत सिंग रजपूत) वकिल सिंग (रणवीर शौरी) असतात. दरोडे घालणे, लोकांना मारणे हे त्यांचे रोजचेच काम असते. पण लहान मुलांना आणि स्त्रियांना हानी पोहोचवायची नाही हा त्यांचा नियम असतो. अशाच एका दरोड्यात पोलीस मान सिंग आणि त्यांच्या टोळीतील अनेकांना मारतात. यानंतर वकील त्यांच्या टोळीचा प्रमुख होतो. यांच्या आयुष्यात या उलाढाली सुरू असतानाच इंदूमती (भूमी पेडणेकर) एका लहान मुलीला रुग्णालयात नेण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागते. या लहान मुलीवर बलात्कार झाल्यामुळे तिची अवस्था अतिशय नाजूक असते. या मुलीला रुग्णालयात नेले नाही तर तिच्या जीवाला धोका असतो आणि त्यामुळे लखना आणि वकिल यांना मदत करण्याचे ठरवतात. पण या मुलीवरूनच यांच्यात भांडणे होतात आणि वकील, लकवा या दोघांचे वेगवेगळे गट निर्माण होतात. आता मान सिंग प्रमाणे त्याच्या पूर्ण टोळीला मारायचे असे पोलीस विरेंद्र सिंगने (आशुतोष राणा) ठरवलेले असते. भूतकाळातील काही गोष्टींमुळे त्याचा मानसिंग आणि त्याच्या टोळीवर राग असतो. वकील आणि लखन दोघांची टोळी वेगळी झाली असली तरी पोलिस दोघांच्याही मागावर असतात. हे दोघे पोलिसांना चकवा देतात का? लखन त्या मुलीला रुग्णालयात नेण्यात यशस्वी ठरतो का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच मिळू शकतात.

सोनचिडिया या चित्रपटाचा काळ भारतातात ज्यावेळी आणीबाणी होती तेव्हाचा आहे. त्यामुळे दिग्दर्शकाने चित्रपट दिग्दर्शित करताना चित्रपटातील काळ हा सत्तरीचा दिसला पाहिजे यासाठी प्रचंड मेहनत केली हे प्रत्येक दृश्यातून जाणवते. चित्रपटाची सिनेमेटोग्राफी देखील चांगली झाली आहे. दिग्दर्शकाने चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा खूप चांगल्या प्रकारे मांडल्या आहेत आणि त्याचमुळे त्या व्यक्तिरेखा या खऱ्या आयुष्यातील वाटतात आणि नकळतपणे आपल्या मनात यांच्याविषयी सहानभूती निर्माण होते आणि चित्रपटात पुढे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचते. आपण काम करतोय ते चुकीचे आहे, आपले आयुष्य अतिशय बिकट आहे याची जाणीव झालेल्या एका दरोडेखोरांचा एक संवाद या चित्रपटात आहे. तो म्हणतो, ३० किमी चालायचे, मिळाली तर साधी चपाती खाऊन राहायचे हेच आपले आयुष्य बनले आहे... हा संवाद त्यांचे आयुष्य तंतोतंत मांडतो. या चित्रपटातील सगळेच संवाद खूप चांगले असून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवणार यात काहीच शंका नाही. चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी एकाहून एक सरस अभिनय केला आहे. मनोज वाजपेयी या चित्रपटात केवळ काहीच दृश्यात असला तरी तो भाव खाऊन गेला आहे. रणवीर शौरीने त्याच्या वाट्याला आलेली भूमिका चोखपणे पार पाडली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर सुशांतच्या अभिनयाच्या तुम्ही पुन्हा एकदा प्रेमात पडाल. कारण सुशांतने त्याच्या देहबोलीतून ही व्यक्तिरेखा अक्षरशः जिवंत केली आहे. भूमीच्या आजवरच्या करियर मधील ही खूप वेगळी भूमिका असून अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या स्त्रीची भूमिका तिने खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे. आशुतोष राणाने देखील त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. सोनचिडिया या चित्रपटाची कथा मनावर पकड घेत असली तरी काही वेळा चित्रपट खूपच संथ वाटतो. तसेच थोडासा ताणल्यासारखा देखील वाटतो. पण असे असले तरी सोनचिडिया मनात घर करतो. 

 

टॅग्स :सोन चिरैयासुशांत सिंग रजपूतभूमी पेडणेकर मनोज वाजपेयीआशुतोष राणारणवीर शौरी