Join us

Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'

By संजय घावरे | Updated: July 25, 2025 19:31 IST

Sarzameen Movie Review: 'सरजमीं' हा चित्रपट देशभक्तीने ओतप्रोत भरलेला असेल असे शीर्षकावरून वाटते, पण चित्रपटात मात्र पिता-पुत्राच्या नात्यांची भावनिक गोष्ट पाहायला मिळते.

Release Date: July 25, 2025Language: हिंदी
Cast: पृथ्वीराज सुकुमारन, काजोल, इब्राहिम अली खान, बोमन ईराणी, जितेंद्र जोशी
Producer: करण जोहर, हिरू यश जोहर, अपूर्व मेहता, आदर पूनावालाDirector: कायोज ईराणी
Duration: २ तास १७ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

>>संजय घावरे

हा चित्रपट देशभक्तीने ओतप्रोत भरलेला असेल असे शीर्षकावरून वाटते, पण चित्रपटात मात्र पिता-पुत्राच्या नात्यांची भावनिक गोष्ट पाहायला मिळते. 'सरजमीं' या शीर्षकाखाली कायोज ईराणी यांनी जे दाखवले आहे, ते पाहिल्यावर हसावे की रडावे ते समजत नाही. बऱ्याच त्रुटी असलेल्या या चित्रपटाला पृथ्वीराज सुकुमारन आणि काजोल यांनी तारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. 

कथानक : देशासाठी कोणाचीही पर्वा न करणारा कर्नल विजय मेनन, पत्नी मेहेर आणि मुलगा हरमन यांची ही गोष्ट आहे. आपला मुलगा आपल्याप्रमाणेच धाडसी बनावा असे कर्नलला वाटत असते, पण हरमन खूप कमजोर असतो. आत्मविश्वास हरवलेला हरमन बोलताना अडखळतो. त्यामुळे कर्नलला त्याची लाज वाटत असते, पण दोघांमधील नाते सुधारावे यासाठी मेहेर प्रयत्न करत असते. याच दरम्यान विजय दोन अतिरेक्यांना पकडतो. त्यांना सोडविण्यासाठी अतिरेकी हरमनचे अपहरण करतात. त्यानंतरचे नाट्य चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन - 'देशापुढे कोणीही मोठी नाही', या सुरेख वनलाईनवर उत्कंठावर्धक पटकथा गरजेची होती. सैन्य कारवाया आणि इतर गोष्टी आणखी तपशीलवार मांडायला हव्या होत्या. काही ठिकाणी चित्रपट भावूक करतो, पण बऱ्याच ठिकाणी अतिशयोक्तीही वाटते. कल्पनेपलीकडला क्लायमॅक्स निव्वळ मेलो ड्रामा आहे. भारतीय सैन्याच्या कैदेतील अतिरेक्याच्या सेलमध्ये एखादी अनोळखी व्यक्ती जाऊन थेट त्याला मारण्याचा प्रयत्न करते आणि तिथे एकही सैनिक नसतो हे कितपत पटण्याजोगे आहे... काश्मीरमधील लोकेशन्सवरील निसर्गसौंदर्य सुरेखरीत्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. 

अभिनय : पुन्हा एकदा पृथ्वीराज सुकुमारन आणि काजोल यांचा दमदार अभिनय पाहायला मिळतो. पृथ्वीराजने एकाच व्यक्तिरेखेच्या दोन बाजू लीलया सादर केल्या आहेत. काजोलने साकारलेली आई खूपच वेगळी आहे. क्लायमॅक्समध्ये तिचे विश्वास न बसण्याजोगे रूप समोर येते. इब्राहिम अली खानने 'नादानियां'च्या तुलनेत चांगला अभिनय केला आहे, पण आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. जितेंद्र जोशीने रंगवलेला आर्मी आॅफिसरही चांगला झाला आहे. बोमन ईराणीची भूमिका खूप छोटीशी आहे.

सकारात्मक बाजू : अभिनय, कला दिग्दर्शन, गीत-संगीतनकारात्मक बाजू : पटकथा, दिग्दर्शन, वातावरण निर्मिती, तपशीलथोडक्यात काय तर मोकळा वेळ असेल तर वडील-मुलाच्या नात्यांची ही गोष्ट फार अपेक्षा न ठेवता पाहायला हरकत नाही.

टॅग्स :काजोलइब्राहिम अली खानबोमन इराणीजितेंद्र जोशी