>>देवेंद्र जाधव
संगीत नाटकांची स्वत:ची एक जातकुळी आहे. बालगंधर्व, केशवराव भोसले, देवल मास्तर अशा असामींनी ही नाटकं रंगभूमीवर गाजवली आहेत. हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावेने २०१५ ला आलेल्या 'कट्यार काळजात घुसली' नाटकाचा सिनेमाचा करण्याचं शिवधनुष्य लीलया पेललं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'संगीत मानापमान' निमित्ताने सुबोधची ही नवी कलाकृती मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झालीय का? याचा आढावा.
'संगीत मानापमान'ची कथा संग्रामपूर राज्यातील विजयी उत्सवापासून सुरु होते. याच प्रसंगी राज्यातील ज्येष्ठ सेनापती (शैलेश दातार) निवृत्त होण्याचा विचार महाराणींना सांगतात. त्यांच्याजागी उपासेनापती चंद्रविलासची (सुमीत राघवन) सेनापती पदावर निवड करण्याचा विचार समोर येतो. सेनापतींची मुलगी भामिनी (वैदेही परशुरामी) आणि चंद्रविलास हे दोघे लहानपणापासून एकमेकांना ओळखत असल्याने त्यांची घनिष्ट मैत्री असते. चंद्रविलास सेनापतीपद मिळवून भामिनीशी लग्न करण्याची स्वप्न रंगवत असतो.
दुसरीकडे संग्रामपूरमधील एका छोट्या वाडीत राहणारा धैर्यधर (सुबोध भावे) त्याचं धाडस सिद्ध करून संग्रामपूरच्या सैन्यात भरती होतो. भामिनीच्या वाढदिवशी ज्येष्ठ सेनापती धैर्यधरच्या आईसमोर भामिनी आणि धैर्यधराच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. पण भामिनी मात्र हा प्रस्ताव धुडकावून लावत सर्वांसमोर धैर्यधराच्या कुटुंबाचा अपमान करते. भामिनीने केलेला अपमान धैर्यधरला सहन होत नाही. दुसरीकडे चंद्रविलास भामिनीच्या मनात धैर्यधराबद्दल आणखी विष कालवतो. मग सुरु होतो मान-अपमानाचा अनोखा खेळ. यात कोण बाजी मारतं आणि शेवटी विजय कोणाचा होतो, याची कहाणी म्हणजे 'संगीत मानापमान'.
'संगीत मानापमान'साठी दिग्दर्शक म्हणून सुबोध भावेने घेतलेली मेहनत, कल्पकता, गाण्यांची सिनेमात केलेली रचना या गोष्टींना पैकीच्या पैकी मार्क्स. दिग्दर्शकीय नजरेने सुबोध भावेने काही प्रसंग सुंदर दाखवले आहेत. याशिवाय शंकर-एहसान-लॉय यांच्या संगीतस्वरांनी सजलेली 'वंदन हो', 'चंद्रिका' ही नवी गाणीही चांगली जमली आहेत.
अभिनयाच्या बाबतीत सुमीत राघवनने रंगवलेला कपटी, गर्विष्ठ चंद्रविलास छाप पाडतो. वैदेही भामिनीच्या भूमिकेत सुंदर दिसली आहेच शिवाय सुंदर अभिनयही केलाय. धैर्यधरच्या भूमिकेत सुबोधनेही छान काम केलंय. धीरेन राजेंच्या भूमिकेत उपेंद्र लिमयेही लक्षात राहतो. शैलेश दातार, नीना कुळकर्णी, निवेदिता सराफ यांनीही आपापल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत.
'संगीत मानापमान'ची मोठी उणीव अशी की, नाटकातील गाजलेल्या मूळ गाण्यांची चाल बदलल्याने सिनेमा पाहायला जाणाऱ्या संगीतप्रेमींची काहीशी निराशा होईल. अॅक्शन सीन्सही आणखी रोमांचक करता आले असतो. याशिवाय दिग्दर्शक म्हणूनही सुबोध भावे सिनेमा फुलवण्यात काहीसा कमी पडलाय. काही प्रसंग टाळून सिनेमाची लांबी जर कमी करता आली असती, तर 'संगीत मानापमान' आणखी रंजक झाला असता. एकूणच कृष्णाजी खाडिलकर यांची अजरामर नाट्यकृती 'संगीत मानापमान' रुपेरी पडद्यावर एकदा अनुभवण्यासारखी निश्चित आहे.