>>अबोली कुलकर्णी-शेलदरकर
मोहित सुरी हा असा दिग्दर्शक आहे जो 'एक व्हिलेन', 'आशिकी २' यासारख्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. संगीत, प्रेमकथा, स्टारकास्ट या सर्वच बाबींवर तो चोखंदळपणे काम करतो. यावेळी मोहित सुरी एक नवी जोडी रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. अहान पांडे आणि अनीत पड्डा या फ्रेश जोडीचा नवा चित्रपट सैयारा (Saira Movie) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चला तर मग बघूयात, हा चित्रपट नेमका कसा आहे ताे.
कथानक : ही एक भावनिक प्रेमकथा आहे. वाणी बत्रा (अनीत पड्डा) हिला कविता लिहायला प्रचंड आवडत असते. परंतु, ही गोष्ट ती जगापासून लपवून ठेवते. लग्नाच्या दिवशी तिचा होणारा पती तिला साेडून जातो, त्यामुळे ती दुखावली जाते आणि कविता लिहिणे थांबवते. सहा महिन्यांनंतर वाणीला पत्रकाराची नोकरी मिळते, जिथे तिची भेट कृष कपूर (अहान पांडे) सोबत होते. गायक बनण्याच्या प्रयत्नात असलेला तो शीघ्रकोपी आणि एकटा युवक असतो. जेव्हा कृष वाणीची जुनी कविता वाचतो तेव्हा तो त्यावर गाणे लिहिण्यासाठी सांगतो. दरम्यान, दोघे एकमेकांच्या जवळ येतात. त्यांच्यात एक नवे नाते निर्माण होते. मात्र, यात अनेक अडचणी येतात. त्यातून ते कसा मार्ग काढतात? हे जर जाणून घ्यायचे असेल तर चित्रपट बघावा लागेल.
लेखक व दिग्दर्शक : हृदयाला भिडणारी प्रेमकथा लिहिणे हा मोहित सुरी यांचा हातखंडा आहे. ‘आशिकी २’,‘एक व्हिलेन’, ‘वो लम्हे’ यांच्याप्रमाणेच अजून एक प्रेमकथा लिहिण्याचा प्रयत्न मोहित सुरी यांनी केला. कधी कधी चित्रपट लांबलचक वाटू शकतो, पण त्याचे भावनिक बंध प्रेक्षकांना बांधून ठेवतात. मोहितने पहिल्यांदाच यशराज फिल्म्ससोबत काम केले आहे. कथानकाची सुरूवात ही धीमी असून काही दृश्यांबद्दल आपण अंदाज बांधू शकतो. टिवस्ट ॲण्ड टर्न्स नसून सरळ साधी कहाणी आहे. संगीत, बॅकग्राऊंड म्युजिक, पटकथा हे सर्वच प्रभावी वाटतात.
अभिनय : अहान पांडेने कृशची व्यक्तीरेखा साकारली आहे. सुरूवातीला थोडा गंभीर स्वरूपाचा वाटतो, पण जशीजशी कहाणी पुढे जाते त्याच्या डोळयांतून हावभावांसोबतच भावनाही दिसतात. अनीत पड्डाने वाणीची भूमिका निरागसपणे साकारली आहे. मात्र, वाणीच्या आयुष्यात एक असे वळण येते की, ते प्रेक्षकांना अस्वस्थ करते.
सकारात्मक बाजू : संगीत, कथा, पटकथा, अभिनयनकारात्मक बाजू : सुरूवात धीमी, काही लांबलचक सीन्सथोडक्यात : प्रेमकहाणीचे चाहते असाल तर नक्कीच बघा.