Join us  

Romeo Akbar Walter Movie Review : भरकटलेली कथा पण जॉनचा दमदार अभिनय

By प्राजक्ता चिटणीस | Published: April 05, 2019 3:55 PM

रोमिओ अकबर वॉल्टर या चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात जॉन अब्राहम कैदेत असून त्याचा प्रचंड छळ केला जात आहे. त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी त्याच्यावर अमानुष अत्याचार केला जात आहे असे दाखवण्यात आले आहे.

ठळक मुद्देरोमिओ अकबर वॉल्टर या चित्रपटाची सुरुवात खूपच चांगली असली तरी शेवट येईपर्यंत कथेवरची पकड कुठेतरी सुटत जात असल्याचं जाणवतं.
Release Date: April 05, 2019Language: हिंदी
Cast: जॉन अब्राहम, जॅकी श्रॉफ, सिकंदर खेर, रघुवीर यादव, मौनी रॉय
Producer: वायकॉम 18 मोशन पिक्चर्स, धीरज वाधवा, अजय कपूर, गॅरी ग्रेवाल, वेन्सा वालिया Director: रॉबी ग्रेवाल
Duration: 2 तास 30 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

भारतीय गुप्तचर खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आयुष्यावर आधारित राझी, एक था टायगर यांसारखे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षांत आपल्याला पाहायला मिळाले आहेत. रोमिओ अकबर वॉल्टर या चित्रपटात देखील आपल्याला अशाच एक अधिकाऱ्याची आगळी वेगळी कथा पाहायला मिळते.

रोमिओ अकबर वॉल्टर या चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात जॉन अब्राहम कैदेत असून त्याचा प्रचंड छळ केला जात आहे. त्याच्याकडून माहिती मिळवण्यासाठी त्याच्यावर अमानुष अत्याचार केला जात आहे असे दाखवण्यात आले आहे. हे दृश्य पाहून नक्कीच अंगावर काटा येतो आणि आता पुढे काय होणार याची उत्सुकता आपल्याला लागते.1971 ला भारत-पाकिस्तान युद्ध झाले, त्याआधीचा काळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर शत्रूच्या गोटात काय सुरू आहे याची माहिती घेण्यासाठी भारतीय गुप्तचर खाते एका विश्वासू माणसाच्या शोधात असते तर दुसरीकडे रोमिओ (जॉन अब्राहम) हा एका बँकेत काम करत असतो. त्याची आई हेच त्याचे संपूर्ण जग असते. सामान्य माणसारखे त्याचे आयुष्य सुरळीत सुरू असताना अचानक श्रीकांत राय (जॅकी श्रॉफ) त्याला भारतीय गुप्तहेर खात्यात समावेश करण्याची ऑफर देतो. रोमिओचे वडील हे लष्करात असतात. त्यामुळे देशप्रेमाची भावना रोमिओमध्ये देखील असते आणि त्यामुळे तो गुप्तचर खात्यात काम करण्याचे ठरवतो. काही महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर त्याला पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येते. तिथे तो एका हॉटेलमध्ये काम करत असतो. लष्करी अधिकाऱ्यांना अवैधपणे हत्यार देणाऱ्या एका टोळीच्या प्रमुखासोबत त्याची तिथे भेट होते आणि तो त्याचे मन जिंकतो. तो देखील त्या टोळीसोबत काम करू लागतो. त्याच्यामुळे लष्काराच्या सगळ्या गोष्टी त्याला सहजपणे कळू लागतात आणि ही माहिती तो श्रीकांत रायला देत असतो. पण काही काळानंतर पाकिस्तानी लष्कराला रोमिओवर संशय येतो. त्यानंतर त्याला तिथे कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, तो या सगळ्यावर कशी मात करतो, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर भारतीय सैन्य आपल्या हालचाली कशाप्रकारे करते हे सगळे रोमिओ अकबर वॉल्टर या चित्रपटात पाहायला मिळते.

रोमिओ अकबर वॉल्टर या चित्रपटाची सुरुवात खूपच चांगली असली तरी शेवट येईपर्यंत कथेवरची पकड कुठेतरी सुटत जात असल्याचं जाणवतं. रोमिओने दिलेली माहिती ही भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर खूपच महत्त्वाची असते. त्यामुळे हे काम करण्यासाठी अतिशय हुशार व्यक्तीची गरज असते असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण या महत्त्वाच्या कामासाठी रोमिओचीच निवड का केली जाते हे चित्रपटात तितकेसे स्पष्टपणे दाखवण्यात आलेले नाहीये. पाकिस्तानात गेल्यावर भारतासाठी काम करणारे काही लोक रोमिओला मदत करतात. पण त्याला सतत मदत करणारा आणि त्याच्यासोबत असणारा मुद्दसर (रघुवीर यादव) पाकिस्तानात काय करतोय, तो कधीपासून भारतासाठी काम करतोय या गोष्टी दाखवण्यात आल्याच नाहीत. त्यामुळे ती भूमिका काय आहे ते स्पष्टच होत नाही. तसेच रोमिओ पाकिस्तानात गेल्यानंतर त्याची तिथल्या एका टोळीच्या प्रमुखासोबत लगेचच मैत्री होते, त्याच्यावर एकदा हल्ला होतो आणि त्यातून रोमिओ त्याला वाचवतो, अशी कथा आपण आजवर अनेक चित्रपटात पाहिली आहे. त्यामुळे या गोष्टी खऱ्याखुऱ्या न वाटता फिल्मी वाटतात. तसेच चित्रपटात जॉन आणि मौनी यांचे प्रेमप्रकरण उगाचच दाखवण्यात आले आहे. त्यांच्यावर एक गाणे देखील चित्रीत करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये अतिशय महत्त्वाच्या कामगिरीवर असताना त्यांना आपल्या खाजगी जीवनासाठी वेळ मिळतो हे अतिशयोक्तीचे वाटते. पण रोमिओ पाकिस्तानीच्या तडाख्यात सापडल्यानंतर त्याने घेतलेली भूमिका, श्रीकांत आणि त्याचे फोनवरचे संभाषण या गोष्टी चित्रपटात चांगल्याप्रकारे दाखवल्या आहेत. आपल्या देशासाठी आपले घर, कुटुंब सगळे काही सोडून जगणारे भारतीय गुप्तचर खात्यात अनेकजण आहेत. हा चित्रपट पाहिल्यावर त्यांचे आयुष्य किती खडतर आहे याची नक्कीच जाणीव होते. 

या चित्रपटात जॅकी श्रॉफ, सिकंदर खेर यांचा अभिनय वाखाण्याजोगा आहे. रघुवीर यादव छोट्याशा भूमिकेत असला तरी त्याने आपली छाप सोडली आहे. मौनी रॉय चित्रपटात केवळ काही दृश्यांसाठी आहे. त्यामुळे तिचा प्रभाव पडत नाही. जॉन अब्राहमने रोमिओ ही भूमिका अतिशय ताकदीने साकारली आहे. जॉनचे फॅन असाल तर हा चित्रपट त्याच्यासाठी नक्कीच पाहा.

टॅग्स :रोमिओ, अकबर, वॉल्टरजॉन अब्राहमजॅकी श्रॉफसिकंदर खेरमौनी राॅय