Join us  

रहस्यांच्या गाठी सोडणारी विचित्र प्रेम कहाणी; 'मर्डर मुबारक' सिनेमा पाहण्याआधी एकदा रिव्ह्यू वाचा

By संजय घावरे | Published: March 17, 2024 11:22 AM

Murder Mubarak Movie Review : कसा आहे करिश्मा कपूरचा मर्डर मुबारक? वाचा रिव्ह्यू

Release Date: March 15, 2024Language: हिंदी
Cast: पंकज त्रिपाठी, सारा अली खान, विजय वर्मा, करिष्मा कपूर, संजय कपूर, डिंपल कपाडीया, टिस्का चोप्रा, देवेन भोजानी, आशिम गुलाटी, ब्रिजेंद्र काला, प्रियांक तिवारी
Producer: दिनेश विजानDirector: होमी अदजानिया
Duration: २ तास २० मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

मर्डर मिस्ट्री सोडवताना अखेरपर्यंत रहस्य उलगडू न देता कथानकाचा गुंता सोडवावा लागतो. दिग्दर्शक होमी अदजानिया यांनी या चित्रपटात सादर केलेलं कथानक रहस्यांच्या बऱ्याच गाठी सोडत एक अशी प्रेम कहाणी सादर करतं, जी विचित्रच नव्हे, तर हैराण करणारी ठरते.

कथानक : द रॉयल क्लब ऑफ दिल्ली या श्रीमंतांच्या ब्रिटिशकालीन क्लबमधील ही कथा आहे. बिनधास्त विधवा बॉम्बी, तिच्यावर प्रेम करणारा प्रियकर आकाश डोग्रा, गॅसिप्स क्वीन रोशनी, तिचा नशेबाज मुलगा यश, वीस रुपयांची टिप देणारा राजा रणविजय सिंह, क्लबचा अध्यक्ष देवेंद्र भट्टी, स्कल्पचर आर्टिस्ट कूकी, बी ग्रेड चित्रपटांची नायिका शहनाज नूरानी असे बरेच या क्लबचे सदस्य आहेत. क्लबमधील फिटनेस ट्रेनर लिओची हत्या होते. हत्येच्या तपासाची जबाबदारी डिसीपी भवानी सिंगकडे येते. तपास करताना क्लबमधील सदस्यांसोबतच तिथे काम करणारी गंगा, मनोरुग्ण गप्पी आणि इतर फिटनेस ट्रेनर्सकडेही संशयाची सुई वळते. भवानी अत्यंत शांत डोक्याने रहस्याचा गुंता सोडवतो.

लेखन-दिग्दर्शन : पंकज त्रिपाठीचा अनोखा अंदाज ही एकमेव गोष्ट शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यास पुरेशी ठरते. कथा आणि शीर्षकाचा कुठेही मेळ बसत नाही. सुरुवातीला विनोदी अंगाने जाणाऱ्या कथेत नंतर सत्य उलगडत जातं. श्रीमंतांच्या चेहऱ्यावरील बनावटी मुखवटे गळून पडतात. अखेरपर्यंत हत्या कोणी केली? हा प्रश्न अबाधित राखण्याचं काम दिग्दर्शकाने चोख बजावलं आहे. त्याला वातावरण निर्मिती आणि पार्श्वसंगीताचीही साथ लाभली आहे. सुरुवातीच्या दृश्यांत दिशाभूल करण्याचं काम केलं आहे. काही आतर्किक दृश्ये समजण्यापलिकडली आहेत. मर्डर मिस्ट्रीसाठी आवश्यक गती नाही. गीत-संगीताची बाजू सामान्य आहे. सिनेमॅटोग्राफी आणि गेटअप्स चांगले आहेत. 

अभिनय :पंकज त्रिपाठीने साकारलेला पोलिस अधिकारी अफलातून, वेगळा आणि कर्तव्यदक्ष आहे. शांत डोक्याने विचार करून रहस्याचा एक-एक धागा हळूवारपणे सोडवणारा आहे. सारा अली खानच्या व्यक्तिरेखेलाही बरेच कंगोरे असून तिने ते सहजपणे सादर केले आहेत. विजय वर्माने आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांमुळे सुरुवातीपासून संशयाची सुई त्याच्याकडेच वळते. त्यानेही छान काम केलं आहे. करिश्मा कपूर थकल्यासारखी वाटते. श्रीमंतीचा मुखवटा धारण केलेला राजा संजय कपूरने सुरेख साकारला आहे. ब्रिजेंद्र कालाने गप्पी लक्ष वेधतो. टिस्का चोप्राने नेहमीच्या शैलीत काम केलं आहे. डिंपल कपाडीया, देवेन भोजानी, आशिम गुलाटी, प्रियांक तिवारी यांनी छान साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : कथा, दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, वातावरण निर्मिती, पार्श्वसंगीत

नकारात्मक बाजू : चित्रपटाची गती, काही आतर्किक दृश्ये, गीत-संगीतथोडक्यात काय तर मर्डर मिस्ट्रीचे चाहते हा चित्रपट पाहतीलच, पण इतर जॉनर्स आवडणाऱ्या प्रेक्षकांनीही हा चित्रपट कलाकारांचा अनुभव आणि रहस्यमय कथानकासाठी एकदा पाहायला हवा.

टॅग्स :करिश्मा कपूरपंकज त्रिपाठीसिनेमासारा अली खान