Join us  

Mi shivaji park movie review : अभिनयाची जुगलबंदी

By प्राजक्ता चिटणीस | Published: October 19, 2018 3:49 PM

मी शिवाजी पार्क या चित्रपटात अशोक सराफ, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, शिवाजी साटम, सतीश आळेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Release Date: October 18, 2018Language: मराठी
Cast: अशोक सराफ, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, शिवाजी साटम, सतीश आळेकर
Producer: दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैनDirector: महेश मांजरेकर
Duration: २ तास ५ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

आपल्या न्यायव्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत असे नेहमीच म्हटले जाते. एखादी केस अनेक वर्ष न्यायालयात चालवली जाते. पण पुराव्याअभावी आरोपी मोकाट सुटतात. त्यामुळे शहाण्याने कोर्टाची पायरीच चढू नये असे आपण नेहमीच ऐकतो, आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा मी शिवाजी पार्क हा चित्रपट आहे. दिगंबर सावंत (अशोक सराफ), विक्रम राजाध्यक्ष (विक्रम गोखले) सतीश जोशी (सतीश आळेकर), दिलीप प्रधान (दिलीप प्रभावळकर) आणि रुस्तम  (शिवाजी साटम) हे सगळे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स असतात. ते रोज मॉर्निंग वॉकसाठी न चुकता भेटत असतात. पण त्यांचा सतीश जोशी हा मित्र काही दिवसांपासून मॉर्निंग वॉकला येत नाही. आपल्या मित्राला काय झाले हे या सगळ्यांना कळत नसल्याने ते त्याच्या घरी भेटायला जातात. त्यावेळी त्याच्या नातीचा खून झाला असल्याचे यांना कळते. त्याची नात ऐश्वर्या (मंजिरी फडणवीस) ही एक मॉडेल असते आणि तिच्या राहत्या घरी तिचा खून झालेला असतो. तिचा खून एका प्रसिद्ध उद्योगपतीने (उदय टिकेकर) केलेला असतो. पण पुराव्याअभावी त्याला जामीन देखील मिळतो. या सगळ्या गोष्टीचा सावंत, राजाध्यक्ष, रुस्तम, प्रधान आणि जोशी यांना प्रचंड राग येतो. विक्रम हे रिटायर्ड न्यायाधीश असतात, रुस्तम डॉक्टर तर सावंत बडतर्फ पोलीस ऑफिसर... प्रधान यांचे विचार या सगळ्यांपेक्षा वेगळे असतात. त्यामुळे प्रधानाला काहीही न सांगता हे तिघे मिळून आपल्या पद्धतीने जोशींच्या नातीला न्याय देण्याचे ठरवतात. ही सगळी मंडळी मिळून आपला लढा कशाप्रकारे लढतात. या मध्ये त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो हे हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

मी शिवाजी पार्क या चित्रपटाच्या कथेत तसे नावीन्य जाणवत नाही. हा चित्रपट पाहताना आपल्याला नक्कीच रंग दे बसंती या चित्रपटाची आठवण येते. पण या चित्रपटाची मांडणी दिगदर्शकाने खूप चांगल्याप्रकारे केली आहे. अशोक सराफ, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, शिवाजी साटम या दिग्गज कलाकारांना एकत्र पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे. या सगळ्यांनीच अफलातून काम केले आहे. त्यातही पारसी बाबाच्या भूमिकेत असलेले शिवाजी साटम अधिक भावतात. विक्रम गोखले आणि अशोक सराफ यांच्या एकत्रित असलेल्या दृश्यांमध्ये तर अभिनयाची चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळते. नातीच्या मृत्यूमुळे दुखवलेला पण त्याचसोबत तिच्या मारेकऱ्याला शिक्षा देण्यासाठी काहीही करण्यास तयार असलेला जोशी ही भूमिका सतीश आळेकर यांनी चांगल्याप्रकारे साकारली आहे. चित्रपटात शरद पोंक्षे हे काहीच दृश्यात असले तरी ते भाव खाऊन गेले आहेत. मध्यंतरपर्यंत चित्रपट प्रेक्षकांवर चांगलीच पकड घेतो. पण मध्यंतरानंतर चित्रपट उगाचच ताणला गेला असल्याचे जाणवते. सावंत याची उपकथा चित्रपटात उगाचच टाकल्यासारखी जाणवते.  सावंत यांचे तरुणपणीचे प्रसंग दाखवताना अभिनेता वेगळा असला तरी त्याला आवाज अशोक सराफ यांचाच देण्यात आला आहे, ही गोष्ट चांगलीच खटकते. काश्मिरा शहाची लावणी मनोरंजन करण्यास अपयशी ठरते. पण आमच्यावर भरोवसा नाय काय हे गाणे चांगले जमून आले आहे. एकंदरीत या शिवाजी पार्कची रपेट मारायला हरकत नाही.  

टॅग्स :मी शिवाजी पार्कअशोक सराफविक्रम गोखलेशिवाजी साटमदिलीप प्रभावळकर