Join us  

Laila majnu movie review - एक ‘जादुई’ प्रेमकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 11:09 AM

लैला मजनू’ सारखी क्लासिक स्टोरी म्हणजेच, एका मुलीवरचे निरपेक्ष प्रेम आणि त्या प्रेमापोटी प्राण व मानसिक संतुलन गमावण्यापर्यंतचा संघर्ष पचवणे जरा कठीणचं. पण तरिही दिग्दर्शक साजिद अली ही तरल प्रेम कथा रंगवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

Release Date: September 07, 2018Language: हिंदी
Cast: अविनाश तिवारी, तृप्ती दिमरी, स्मृती कौल
Producer: एकता कपूर, शोभा कूर, प्रीती अली Director: साजिद अली
Duration: १४० मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

-जान्हवी सामंत

खरे तर ‘लैला मजनू’ की कहानी तो पुरानी हो गयी’... कारण आजच्या बॉलिवूडपटांमध्ये प्रेम एकाशी तर लग्न दुस-याशी, लग्न एकाशी तर प्रेम भलत्याशीच, असे सर्रास घडताना दिसते. अशास्थितीत ‘लैला मजनू’ सारखी क्लासिक स्टोरी म्हणजेच, एका मुलीवरचे निरपेक्ष प्रेम आणि त्या प्रेमापोटी प्राण व मानसिक संतुलन गमावण्यापर्यंतचा संघर्ष पचवणे जरा कठीणचं. पण तरिही दिग्दर्शक साजिद अली ही तरल प्रेम कथा रंगवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ‘लैला मजनू’ची अमर प्रेमकथा एका नव्या रूपात, नव्या ढंगात आणि नव्या अंदाजात सादर करण्याचे प्रयत्न करतो.श्रीनगरच्या एका प्रतिष्ठित कुटुंबातील एक लाडकी मुलगी लैला(तृप्ती तिमरी). तिच्या सौंदर्यावर भाळणारे बरेच ‘मजनू’ शहरात  असतात. या सगळ्यांना झुरवत ठेवण्यात लैला तरबेज असते. कारण तिच्या स्वप्नातला राजकुमार कुणी दुसराच असतो आणि एका रात्री चांदण्या रात्री तिला तिचा स्वप्नातला राजकुमार प्रत्यक्ष भेटतो. हा राजकुमार अर्थात कैस भट्ट (अविनाश तिवारी) सुद्धा लैलाच्या अप्रतिम सौंदर्यावर पहिल्याच नजरेत लुब्ध होतो. लैलाच्या डोळ्यातील कैसबद्दलचे कुतुहूल आणि कैसची लैलाबद्दलची ओढ या रूपात ही कथा पुढे सरकते. पण ज्या कैसवर आपण प्रेम करू लागलोत, त्याच्या कुटुंबाचे आपल्या कुटुंबाचे जुने हाडवैर असल्याचे लैलाला कळते. कैसही हे जाणून असतो. आपल्या प्रेमाचा अंत काय होणार, हे ठाऊक असूनही लैला आणि कैस एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडतात. आपले प्रेम टिकवण्यासाठी त्यांना ब-याच हाल-अपेष्ठा सोसाव्या लागतात. लैलाचे बळजबरीने दुस-या मुलाशी लग्न करून दिले जाते आणि कैस तिच्या विरहाने भ्रमिष्ठ व्हायला लागतो. आजच्या मॉडर्न काळात ही कथा पचणारी नसली तरी दिग्दर्शक साजिद अली असे काही जादुई आणि आभासी जग निर्माण करतो की, आपण सहज त्यात गुंतत जातो.  व्यक्तिचित्रणाच्या बाबतीत ही कथा कुठेतरी कमी पडते. एकमेकांना प्रेमात पाडण्यास भाग पाडणा-या गोष्टी आणि पुढे प्रेमाने दिलेली वेदना मनावर तितक्या प्रभावीपणे बिंबत नाही. पण पटकथा आणि छायाचित्रण इतके उजवे ठरते की, या उणीवा सहज दडपल्या जातात. पहिल्या भागात दोन प्रेमींच्या मनातील उत्कटता आणि पुढे लैलाच्या प्रेमात वेडा झालेल्या कैसच्या स्वभावातील उग्रपणा याचे एक सुंदर संतुलन या चित्रपटात साधले गेले आहे. एक तरल चित्रपट साकारण्यात चित्रपटाच्या संगीताचाही महत्त्वाचा वाटा आहे. नवख्या कलाकारांचा अभिनयही आश्वासक आहे. नायकाकडे ‘हिर रांझा’त राज कुमारने रंगवलेल्या ‘रांझा’चा सहजपणा आहे तर नायिकेकडे हिरसारखे सौंदर्य आहे. आजच्या काळात पचणारा नसला तरी एकदा पाहण्यासारखा हा चित्रपट नक्कीच आहे.

 

टॅग्स :लैला मजनू