Join us  

Social Media या आभासी जगातला एकटेपणा! 'खो गए हम कहां' ने दाखवला तरुणांना आरसा

By ऋचा वझे | Published: January 01, 2024 3:10 PM

सोशल मीडियाचा वापर आणि गैरवापर करणाऱ्यांना आरसा दाखवणारा 'खो गए हम कहा' नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. वाचा कसा आहे हा सिनेमा

Release Date: December 26, 2023
Cast: अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, आदर्श गौरव, कल्की कोचलिन
Producer: एक्सेल एंटरटेन्मेंटDirector: अर्जुन वरैन सिंह
Duration: 2 तास 15 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला 'खो गए हम कहा' सिनेमा सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. थिएटरमध्ये नाही तर थेट ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांचं विशेषत: तरुण पिढीचं लक्ष वेधून घेतलंय. तरुणांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अगदी तशाच या सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचत आहेत. झोया अख्तर, रीमा कागतीने सिनेमाची कथा लिहिली असून अर्जुन वरैन सिंहने दिग्दर्शन केलं आहे. 

कथानक 

सध्या प्रत्येकाच्या हातात असलेलं आणि जवळचं माध्यम म्हणजे सोशल मीडिया. हे माध्यम म्हणजे एक आभासी जगच आहे जे प्रत्येकजण एकमेकांना सतत दाखवत आहे. नवी पिढी तर अक्षरश: याच्या आहारी गेली आहे. अशाच पिढीचं प्रतिनिधित्व करतात हे तीन जण. आहाना (Ananya Pandey), इमाद (Siddhant Chaturvedi) आणि नील (Adarsh Gaurav). या तिघांची लहानपणापासूनची घट्ट मैत्री आहे. आहाना आणि इमाद मुंबईत एकाच फ्लॅटमध्ये राहतात तर नील त्याच्या कुटुंबासोबत राहतो. तिघांचं वेगवेगळं आयुष्य आहे. इमाद स्टॅण्डअप कॉमेडी करतो, आहाना मॅनेजमेंट शिकलेली आहे तर नील हा फिटनेस ट्रेनर असतो. या तिघांच्या आयुष्यात अडचणी आणि आव्हानं आहेत ज्याचा ते सामना करत असतात. या सगळ्यात ते सोशल मीडियाचा कसा वापर आणि गैरवापर करतात हे सिनेमात स्पष्ट कळतं. ब्रेकअप, पैशांची अडचण, इगो प्रॉब्लेम, मैत्रीत दुरावा आणि या सगळ्यात सोशल मीडियाची त्यांच्या आयुष्यातील भूमिका सिनेमातून दाखवण्यात आली आहे. आज प्रत्येक तरुण कसा आणि किती सोशल मीडियाचा वापर करत असेल याचा अंदाज सिनेमा बघताना येतो. सतत मोबाईलकडे जाणारं लक्ष, त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता याकडे सिनेमा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. 

अभिनय 

सिनेमाचं कास्टिंग उत्तम झालं आहेत. अनन्या पांडेला आजपर्यंत तिच्या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.पण या सिनेमातून तिने ते खोडून काढलं आहे. सिद्धांत चतुर्वेदीनेही त्याच्या आजपर्यंतच्या भूमिकेपेक्षा वेगळं साकारण्याचा प्रयत्न केला आहे जो जमून आला आहे. तर आदर्श गौरवने त्याच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. 

दिग्दर्शन

झोया अख्तर आणि रिमा कागती यांनी आजच्या पिढीच्या आयुष्यात डोकावत जसंच्या तसं मांडण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. तर दिग्दर्शक अर्जुन वरैन सिंह यांनी तरुण पिढीची नस बरोबर पकडली आहे. स्क्रीप्टला योग्य न्याय देत त्यांनी तरुण पिढीपर्यंत त्यांना समजेल अशा पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक फ्रेममध्ये तरुणांच्या चेहऱ्यावर दिसणारी अस्वस्थता योग्य पद्धतीने टिपलेली आहे. 

सकारात्मक बाजू: कथा, लेखन दिग्दर्शन, अभिनय 

नकारात्मक बाजू: सिनेमाची गती 

थोडक्यात काय तर समाजाला विशेषत: तरुणांना आरसा दाखवणारा आणि त्यातून योग्य असा संदेश देणारा हा सिनेमा पाहायलाच हवा. 

टॅग्स :अनन्या पांडेसिद्धांत चतुर्वेदीनेटफ्लिक्ससोशल मीडिया