Join us  

Gully boy Movie Review : रणवीर आलियाच्या 'बहोत हार्ड' परफॉर्मन्सने सजलेला 'गल्लीबॉय'

By गीतांजली | Published: February 14, 2019 2:10 PM

रॅप ही संस्कृती आपल्याकडे अमेरिकेतून आली आहे. भारतात हाताच्या बोटावर मोजावे इतकेच रॅपर आहेत.त्यामुळे गल्ली बॉय हा जोयाचा सिनेमा नेमका काय आहे याची उत्सुकता सगळ्यांना सुरुवाती पासूनच लागली होती

Release Date: February 14, 2019Language: हिंदी
Cast: रणवीर सिंग, आलिया भट्ट, सिद्धांत चतुर्वेदी, विजय राज, विजय वर्मा, कल्की कोचलिन आणि अमृता सुभाष
Producer: जोया अख्तर, फराहन अख्तर आणि रितेश सिंधवानी Director: जोया अख्तर
Duration: 2 तास 33 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

गीतांजली आंब्रे 

रॅप हा संगीताचा जॉनर भारतात जास्त प्रचलित नाही आणि रॅप ऐकणारा एक विशिष्ट वर्ग भारतात आहे. मात्र तरीही जोया अख्तरने ही जोखीम पत्कारत नाइजी आणि डिवाइन या खऱ्या रॅपरच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्याचे धाडस केले आहे. मुळात रॅप ही संस्कृती आपल्याकडे अमेरिकेतून आली आहे. भारतात हाताच्या बोटावर मोजावे इतकेच रॅपर आहेत.त्यामुळे गल्ली बॉय हा जोयाचा सिनेमा नेमका काय आहे याची उत्सुकता सगळ्यांना सुरुवाती पासूनच लागली होती. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर हिच उत्सुकता शिगेला पोहोचली. 

सिनेमाची सुरुवात झोपडपट्टीमधल्या गल्लीतून होते. धारावीच्या झोपडट्टीमध्ये राहणारा मुराद हा दुर्लक्षित समाजातील मुलाचे रॅपर बनण्याचे स्वप्न असते. मुरादचे वडील आफताब (विजय राज) ड्रायव्हर असतात. मुरादच्या घरी आई( अमृता सुभाष ) आजी (ज्योती सुभाष) आणि लहान भाऊ असे अत्यंत गरीब परिस्थितीत राहत असतात. यातच मुरादचे वडील दुसरं लग्न करतात आणि कुटुंबातील कलह आणखी वाढतो. या सर्व परिस्थितीत मुरादला भक्कम साथ मिळते ती त्याची गर्लफ्रेंड सखीनाची (आलिया भट्ट). सखीना त्याच्या मुराद ते गल्ली बॉय पर्यंतच्या प्रवासात त्याला अत्यंत खंबीरपणे पाठिशी उभी राहते. मुरादच्या आयुष्यात टर्निंग पाईंट ठरतो तो एमसी शेर उर्फ श्रीकांतची' (सिद्धांत चतुर्वेदी) एंट्री. शेर मुरादला त्याच्या स्वप्नाच्या अधिक जवळ घेऊन जातो असतो. तर दुसरीकडे मुरादच्या वडिलांचा त्याच्या रॅपला असलेला विरोध तीव्र होतो. त्याचे व्हिडीओ पाहुन ते त्याच्यावर  हातदेखील उगारतात. मात्र तरीही मुराद स्वप्न पाहण्याचे थांबवत नाही. परिस्थितीशी संघर्ष करतो ते स्वप्न जगतो ही आणि ते तितक्याच ताकदीने पूर्णदेखील करतो. 

जोया अख्तरने आतापर्यंत दिग्दर्शित केलेल्या सिनेमांपैकी हा सर्वोत्तम सिनेमा आहे. जोयाने जिंदगी ना मिलेगी दोबारा,बॉम्बे टॉकीज, लक बाइ चांस सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे मात्र या सगळ्यात गल्ली बॉय हा सिनेमा खूपच उजवा आणि वेगळा ठरतो. सिनेमाचे सर्वाधिक शूटिंग धारावीतल्या झोपडपट्टीमध्ये झाले असल्याने सिनेमाशी कनेक्ट व्हायला आपल्याला फारसा वेळ लागत नाही. स्क्रीनप्लेबाबत रीमा कागती आणि जोया अख्तरचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

रणवीर सिंगने साकारलेल्या मुरादच्या भूमिकेसाठी अफलातून हा एकच शब्द खूप काही सांगणारा आहे. रणवीर म्हणजे फुलऑन एनर्जी असेच काहीसे समीकरण आतापर्यंत झाले आहे मात्र रणवीरने मुरादच्या भूमिकेतून आपल्या या इमेजलासुद्धा छेद दिला आहे. रणवीरने या सिनेमातून आपला जबरदस्त अभिनय डोळ्याच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर साकारला आहे. त्याच्या करिअरमध्ये ही भूमिका माईलस्टोन ठरेल यात काहीच वाद नाही. ''मैं अपने सपने नही तोडूंगा सच्चाई के वास्ते सच्चाई बदलुंगा सपनों के लिए'' असे अनेक टाळ्या मिळवणारे संवाद या सिनेमात आहेत. सिनेमातील सीन्स अनेक वेळा तुमच्या अंगावर शहारे उभे करतात.

आलिया भट्टच्या अभिनयाबाबत बोलायचे झाले तर तीने रणवीरच्या अभिनयाला तोडीस तोड अभिनय केला  हे. सखिनाच्या भूमिकेतून आलियाने बॉलिवूडला गर्लफ्रेंडची एक वेगळी छटा दाखवली आहे. याआधी आलियाने राझीमध्ये देखील मुस्लिम मुलीची भूमिका साकारली होती. मात्र सहमतपेक्षा सफिना खूपच डँशिंग आणि बिनधास्त आहे. तिच्या करिअरमध्ये तिने साकारलेल्या भूमिकांपैकी ही सर्वोत्कृष्ट भूमिका आहे असे म्हटले तर चुकीचे ठरु नये. सिद्धांत चतुर्वेदी याने गल्ली बॉयमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याचा अभिनय पाहाता तो लंबी रेस का घोडा आहे असेच म्हणावे लागले. विजय वर्मा, कल्कि कोचलीन, विजय राज आणि अमृता सुभाष यांच्या भूमिका छोट्या आहेत मात्र अत्यंत प्रभावी आहेत.

'शंकर- एहसान- लॉय' यांच्या संगीताने सिनेमाला चार चाँद लावले आहेत. अपना भी टाईम आयेगा ह्या गाण्याने  सिनेमाच्या रिलीजच्या आधीपासूनच तरुणांची मनं जिकंली आहेत. सिनेमाचे बॅकग्राऊंड स्कोर आणि विजुअल्स हॉलिवूडच्या तोडीचे आहेत. सिनेमॅटोग्राफर जय ओझा यांच विशेष कौतुक करायला हवं. सिनेमाच्या पहिल्या सीनपासून ते शेवटच्या सीनपर्यंत तुम्हाला तो खुर्चीला खिळवून ठेवतो आणि हेच सिनेमाचे खरं यश आहे. जोयाचा गल्ली बॉय प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या आणि ते जगाणाऱ्या तरुणांना प्रेरित करुन जातो. स्वप्न पाहा आणि ते सत्यात उतरण्यासाठी संघर्षदेखील करा हाच संदेश गल्ली बॉय प्रत्येकाला देऊन जातो. त्यामुळे या सिनेमाला स्वप्न पाहण्याऱ्या प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊनच पाहावे.

टॅग्स :गली ब्वॉयरणवीर सिंगआलिया भटकल्की कोचलीन