Join us  

Bhoot Part One: The Haunted Ship Movie Review : हाँटेड जहाजावरील थरारक रहस्य

By तेजल गावडे | Published: February 21, 2020 3:52 PM

बॉलिवूडमध्ये फार कमी हॉरर सिनेमे बनले आहेत आणि त्यात आता  'भूत पार्ट १ : द हाँटेड शिप' या चित्रपटातून धर्मा प्रोडक्शनने पहिल्यांदाच हॉरर सिनेमामध्ये पाऊल टाकले आहे. तसेच अभिनेता विकी कौशलचादेखील हा पहिलाच हॉरर चित्रपट आहे.

Release Date: February 21, 2020Language: हिंदी
Cast: विकी कौशल, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा
Producer: करण जोहर, शशांक खेतानDirector: भानू प्रताप सिंग
Duration: २ तास २४ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

- तेजल गावडे

बॉलिवूडमध्ये फार कमी हॉरर सिनेमे बनले आहेत आणि त्यात आता  'भूत पार्ट १ : द हाँटेड शिप' या चित्रपटातून धर्मा प्रोडक्शनने पहिल्यांदाच हॉरर सिनेमामध्ये पाऊल टाकले आहे. तसेच अभिनेता विकी कौशलचादेखील हा पहिलाच हॉरर चित्रपट आहे. या चित्रपटाचा पोस्टर व ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून विकी कौशल व हॉरर कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता 'भूत : द हाँटेड शिप' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

पृथ्वी (विकी कौशल) एका घटनेत आपली पत्नी (भूमी पेडणेकर) आणि छोट्या मुलीला हरपतो. तो मुंबईतील एका शिपयार्ड कंपनीत अधिकाऱ्याची नोकरी करत असतो. पत्नी व मुलीच्या मृत्यूमागे तो स्वतःला जबाबदार समजत असतो. त्यामुळे याची खंत त्याच्या मनात आजही कायम असते. तो पत्नी व मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून पूर्णपणे बाहेर आलेला नसतो. यादरम्यान अचानक एक दिवस मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावर सी बर्ड नामक हाँटेड जहाज येऊन धडकते. त्यामुळे या जहाजाबद्दल उलटसुलट चर्चा होऊ लागते. हे जहाज तिथून हटविण्यासाठी पृथ्वीच्या कंपनीवर दबाव टाकला जातो आणि ही जबाबदारी पृथ्वी आणि त्याचा मित्र रियाजला दिली जाते. ज्यावेळी पृथ्वी त्या जहाजाची पडताळणी करण्यासाठी जातो. तेव्हा तिथे त्याच्यासोबत काही विचित्र घटना घडतात. त्याचा तो पाठपुरावा करू लागतो. त्यावेळी त्याच्यासमोर काही विचित्र गोष्टी समोर येतात. या जहाजावर एक १३ वर्षांची मुलगी बऱ्याच वर्षांपासून राहत असते. जिच्यावर एका वाईट आत्मेचा प्रभाव असतो. ती आत्मा जहाजावर येणाऱ्या लोकांचा बळी घेत असते. तो आत्मा लोकांचा बळी का घेत असतो? की त्या आत्माला कोणाचा सूड घ्यायचा असतो का? पृथ्वी त्या मुलीची सुटका करतो का? हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पहावा लागेल.

आतापर्यंत बॉलिवूडमध्ये बरेच हॉररपट आले आहेत. मात्र या चित्रपटाच्या कथेत थोडेफार नाविन्य आहे. त्यामुळे पूर्वाधात वाटतं की या चित्रपटात इतर हॉररपटांपेक्षा काहीतरी वेगळे पहायला मिळेल. मात्र उत्तरार्धात भूत पळविण्यासाठी तोच मार्ग अवलंबल्याचं पहायला मिळतं. चित्रपट पाहत असताना धडकी भरणाऱ्या दृश्यांची कमतरता जाणवते. तसेच बऱ्याच ठिकाणी राझ चित्रपट आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या हॉरर चित्रपटांतील दृश्यांची आठवण आपल्याला नक्कीच होते. अभिनयाबद्दल सांगायचं तर विकी कौशलचा हा पहिलाच हॉरर चित्रपट होता. पण त्याने नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय केला आहे.  त्याच्या अभिनयाच्या जोरावर या चित्रपटाने तग धरला आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अभिनेत्री भूमी पेडणेकरने विकीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिच्या भूमिकेला वाव नसला तरी तिने चांगले काम केले आहे. तसेच अभिनेता आशुतोष राणा यांची उत्तरार्धात एन्ट्री होते. त्यांचे काम जास्त नसले तरीदेखील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहते. दिग्दर्शक भानु प्रताप सिंग यांची दिग्दर्शन करण्याची ही पहिलीच वेळ असली तरी दिग्दर्शनात कमतरता जाणवत नाही. काही सीन्समध्ये चित्रपट प्रेक्षकांना घाबरवण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटाच्या संगीताबद्दल सांगायचं तर चित्रपटात एकच गाणे आहे. बॅकग्राउंड स्कोअर चांगले असल्यामुळे काही सीन आपल्याला प्रभावित करतात. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीदेखील चांगली झाली आहे. चित्रपटाचे जास्त शूटिंग जहाजावर करण्यात आले असून जे कथेला योग्य न्याय देते. त्यामुळे ज्यांना हॉररपट पहायला आवडत असेल त्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा. 

टॅग्स :भूत चित्रपटविकी कौशलभूमी पेडणेकर आशुतोष राणा