Join us  

Bell Bottom Review: कसा आहे अक्षयचा ‘बेल बॉटम’, सिनेमा पाहण्याआधी वाचा Review

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 5:05 PM

Bell Bottom Review: अक्षयचा बेल बॉटम हा सिनेमा रिलीज झालाये. वीकेंडला हा सिनेमा पाहण्याचा प्लान करण्याआधी हे वाचाच...

ठळक मुद्दे6 वर्षांत केवळ 3 सिनेमे करणारी वाणी कपूर हिची भूमिका अगदीच लहान आहे. पण दमदार आहे. हुमा कुरेशीच्या वाट्यालाही फार आलेलं नाही.
Release Date: August 19, 2021Language: हिंदी
Cast: अक्षय कुमार, वाणी कपूर, हुमा कुरैशी, लारा दत्ता, आदिल हुसैन
Producer: जॅकी भगनानी, वासू भगनानीDirector: रंजित तिवारी
Genre:
लोकमत रेटिंग्स

कोरोना महामारीच्या काळात चित्रपटसृष्टी ठप्प पडली. चित्रपटगृहांना कुलूप लागलं आणि अनेक बनून तयार असलेले सिनेमे ओटीटीवर रिलीज करण्याची वेळ आली. अद्यापही चित्रपटगृहांची कवाडं बंद असताना एक मोठा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज करण्याचा निर्णय घेणं हा खरं तर धाडसी निर्णय म्हणायला हवा. ‘बेल बॉटम’च्या मेकर्सनी हे धाडसं दाखवलं. (Bell Bottom Review) चित्रपटगृहांना पुन्हा एकदा सोनेरी दिवस दाखवण्याचा जिम्मा अक्षय कुमारच्या खांद्यावर आला आणि विशेष म्हणजे अक्षयनं ही जबाबदारी अगदी लिलया पार पाडली. होय, ‘बेल बॉटम’ हा सिनेमा पाहिल्यानंतर हेच म्हणावं लागेल. अक्षयचा ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) हा सिनेमा शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.  

एका रॉ एजंटभोवती फिरणारी या चित्रपटाची 80 च्या दशकाची पार्श्वभूमी असलेली अख्खी कथा तुम्हाला गुंतवून ठेवते. 200 पेक्षा अधिक प्रवासी असलेल्या एका विमानाचं अपहरण केलं जातं. अशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (लारा दत्तानं ही भूमिका साकारली आहे) यांच्यापुढं एकच मार्ग उरतो. तो म्हणजे शेजा-यांशी चर्चा. कारण अपहृत विमान याच शेजा-यांच्या जमिनीवर उभं असतं. विमानातील प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात तुरूंगामध्ये असलेल्या कट्टर दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी अपरहरणकर्ते करतात. अशात रॉ प्रमुख (आदिल हुसैन) पंतप्रधानांना यावेळी नवा डाव खेळण्याचा सल्ला देतात आणि इथून नायकाची एन्ट्री होते. हा नायक अर्थातच अंशुल मल्होत्रा अर्थात बेल बॉटम (अक्षय कुमार). बेल बॉटम या कोड नावाचा हा रॉ एजंट दहशतवाद्यांच्या तावडीतून अपहृतांची सुटका कशी करतो, हे जाणून घेण्यासाठी अर्थातच तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

‘लखनौ सेंट्रल’सारखा फ्लॉप सिनेमा दिल्यानंतर दिग्दर्शक रंजीत एम तिवारी यांनी या चित्रपटात अक्षयचा अतिशय खुबीने वापर केला आहे. एकीकडे विमानाचं अपहरण, दुसरीकडे अक्षयच्या रॉ एजंट बनण्याची कहाणी, मायलेकाचे संबंध, पती-पत्नीमधील प्रेम या सर्व गोष्टींची सांगड घालताना त्यांनी एक सुंदर कथा गुंफली आहे. शिवाय त्याला वास्तवाची सुंदर किनारही जोडली आहे. कथा आणि पात्रांना गुंफण्यात चित्रपटाचा फर्स्ट हाफ खर्ची होतो. काहीसा रेंगाळतो. पण सेकंड हाफमध्ये सर्वांचा संदर्भ लागतो. भुतकाळ आणि वर्तमान अशा वाटेने जाणारी ही कथा उत्तरार्थात गती घेते. उत्तरार्धातील अनेक अनपेक्षित वळणं येतात. पण चित्रपट भरकटत नाही. उलट तो गुंतवून ठेवतो. 80 च्या दशकाचा काळ पडद्यावर पाहताना रोमांचक वाटतो. अशात असीम अरोरा आणि परवेज शेखचे काही मजेशीर संवाद हसायलाही भाग पाडतात.अभिनयाबद्दल सांगायचं तर अक्षय कुमारच्या अभिनयाला तोड नाही. अख्ख्या चित्रपटातील त्याचा सहज, सुंदर अभिनय पाहताना कौतुक वाटतं. रॉ एजंटच्या भूमिकेत त्याला पाहताना वेगळंच थ्रील जाणवतं. 53 वर्षांचा अक्षय या सिनेमात तो कुठेही नाटकी वाटतं नाही.  

6 वर्षांत केवळ 3 सिनेमे करणारी वाणी कपूर हिची भूमिका अगदीच लहान आहे. पण दमदार आहे. हुमा कुरेशीच्या वाट्यालाही फार आलेलं नाही. अक्षय नंतर या सिनेमाची सर्वाधिक कौतुक करावं लागेल ते लारा दत्ता आणि आदिल हुसैन या दोघांचं. इंदिरा गांधींच्या भूमिकेतील लारा हे या सिनेमातील सर्वात मोठं सरप्राईज पॅकेज आहे. सहज तितकाच सुंदर अभिनय अशा शब्दांत तिच्या या भुमिकेचं कौतुक करता येईल. आदिलने नेहमीप्रमाणे त्याच्या भूमिकेला पूरेपूर न्याय दिला आहे.

सिनेमात गाणी आहेत पण ‘सखियां’ शिवाय कोणतंही गाणं लक्षात राहत नाही. बेट बॉटम सारख्या अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटात संगीताची बाजू आणखी उजवी असती तर निश्चितपणे चित्रपटाची झळाळी आणखी वाढली असती. पण तरिही हा सिनेमा ‘मस्ट वॉच’ असाच आहे.कोरोना महामारीनंतर चित्रपटगृहात बसून एक सुंदर सिनेमा पाहण्याची इच्छा असेल तर हा सिनेमा तुम्ही न चुकवलेलाच बरा. अक्षयचे चाहते असाल तर पाहायलाच हवा. 

टॅग्स :बेल बॉटमअक्षय कुमार