‘अफेअर्स’, ‘गॉसिपिंग’ हे शब्द यापूर्वी केवळ हिंदी चित्रपटसृष्टीमध्येच ऐकायला मिळायचे... म्हणजे बघा ना, अमिताभचे रेखा किंवा परवीन बाबीसोबत चक्कर सुरू आहे... ते अमुक एका ठिकाणी दिसले... अशा गॉसिपिंगला तर उधाण यायचं... म्हणजे ते आता बंद झालं असं नाही बरं का? उलट आताच्या टेक्नोसॅव्ही युगात सोशल नेटवर्किंग मीडिया हा जास्त ‘अॅक्टिव्ह’ झाल्याने सेलीब्रिटींच्या गोष्टी वाऱ्यासारख्या इतरत्र ‘व्हायरल’ होत आहेत. श्रीदेवीची मुलगी आणि सैफ अली खानचा मुलगा यांचा एकत्रित व्हिडीओ फिरला आणि त्याने दोघांच्या पालकांची झोप उडविली... हा अफेअर्स आणि गॉसिपिंगचा ‘फिव्हर’ आता मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील पसरत चालला आहे. हीरो-हीरोइनने एकत्रितपणे चित्रपट करणे, त्यात त्यांची वेगळीच केमिस्ट्री जुळणं... मग त्या केमिस्ट्रीचं प्रेमात रूपांतर.. सगळीकडे त्याची चर्चा... ब्रेकअप आणि त्याचं गॉसिप ही प्रोसेस वर्षानुवर्षं चालतच आली आहे. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दोघं एकत्र दिसायचाच अवकाश... मग लगेच त्यांच्या नात्याला ‘लेबल’ लावणे सुरू होते... आता हेच पाहा ना! वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे या जोडीने ‘कॉफी आणि बरंच काही’ चित्रपट केला आणि त्यांच्यामध्ये बरेच काही सुरू असल्याचे गॉसिपिंग सुरू झाले. पण दोघेही अजून तरी यावर मौन बाळगून आहेत, हे विशेष! मराठीतील काहीसा रांगडा दिसणारा; पण तितकाच काही जणांना चॉकलेटबॉय वाटणारा अनिकेत विश्वासराव हा त्याच्या फॅन्समध्ये ‘लव्हरबॉय’ म्हणूनच खूप फेमस आहे. एका ‘कॅडबरी गर्ल’बरोबर तब्बल आठ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्याने ब्रेकअप केल्यानंतर आता सध्या पूजा सावंतबरोबर त्याचा टाका भिडला आहे. ‘कळत नकळत’ या मालिकेतून अनिकेतने अनेक तरुणींना अक्षरश: प्रेमात पाडले होते. परंतु त्याने केवळ मराठीतच स्वत:ला मर्यादित ठेवले नाही तर हिंदीतही चमेली आणि ‘हवा आने दे’ चित्रपटात हा मराठमोळा चेहरा पाहायला मिळाला. त्याच्या या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये त्याचे आणि पल्लवी सुभाषचे सूर जुळले होते... बरं तेही सहा-आठ महिने नाही बरं... तब्बल ८ वर्षे. आता ८ वर्षे म्हणजे काही कमी काळ नाही ना! त्यांचे अफेअर इतके सिरिअस होते की ते लग्नापर्यंत पोहोचले. पण तरीही त्यांचे ब्रेकअप झाले. तेही कोणामुळे तर अनिकेत आणि पूजा सावंत यांच्याबद्दलच्या गॉसिपमुळे. तसं म्हटलं तर मागील वर्षी १ आॅगस्टला अनिकेत आणि पूजाचा एकच चित्रपट रिलीज झाला... ‘पोश्टर बॉईज’ आणि तो सुपरहिटही झाला. आणि त्यानंतरच अवघ्या काही महिन्यांत म्हणजेच डिसेंबरमध्ये अनिकेत-पल्लवीच्या तब्बल आठ वर्षांच्या नात्यामध्ये दुरावा आला तो कायमचाच. कारण चर्चेला सुरुवात झाली होती ते अनिकेत-पूजामधील मैत्रीपेक्षाही अधिक काही तरी असलेल्या नातेसंबंधामुळे. दोघांमध्ये तिसरा आला की त्या नात्यावरचा विश्वासच उडतो. मुळात पल्लवीला काय अनिकेतचा स्वभाव आठ वर्षांत माहिती नसेल? पण आग लागल्याशिवाय धूर निघत नाही असं म्हणतात... इथेही दोघांमध्ये काही तरी असल्याशिवाय तीसुद्धा इतक्या वर्षांचे नाते संपुष्टात आणण्याचा नक्कीच प्रयत्न करणार नाही. पण आता अनिकेतने तर तिचा विश्वास गमावलाच ना! एका मुलीसाठी तो आठ वर्षांच्या नात्याला तिलांजली देऊ शकतो... तर अजून एखादी मुलगी आवडली तर पूजा तुलाही डच्चू देऊ शकतो... सो बचके रेहना रे बाबा...बचके रेहना रे!
- namrata.phadnis@lokmat.com