Join us  

'मोदीजी सत्तेत आलेत तेव्हापासून…' राकेश बापटने मांडलं स्पष्ट मत, मराठी सिनेमात झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 11:02 AM

हिंदी मालिका, सिनेमांमध्ये भूमिका साकारणारा राकेश बापट 'खुर्ची' सिनेमातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आगामी मराठी चित्रपट 'खुर्ची' चा म्युझिक लाँच सोहळा काल पार पडला. यावेळी सिनेमातील मुख्य अभिनेता राकेश बापट (Rakesh Bapat), अक्षय वाघमारे स्टायलिश लूकमध्ये दिसले. चित्रपटाच्या टीझरने अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. सत्ता, खुर्ची, खून, मारामाऱ्या आणि रक्त या सगळ्याच्या अवतीभोवती फिरणारं कथानक नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवेल यात शंका नाही. म्युझिक लाँचप्रसंगी राकेश बापटने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. 

हिंदी मालिका, सिनेमांमध्ये भूमिका साकारणारा राकेश बापट 'खुर्ची' सिनेमातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. खुर्ची हा राजकारणावर आधारित सिनेमा आहे. सध्या सुरु असलेल्या राजकारणावर राकेश बापटचं मत विचारलं असता तो म्हणाला,'मोदीजी जेव्हापासून आलेत तेव्हापासून लोकं बरंच काही म्हणत आहेत. पण माझ्या मते तरी मोदीजी आल्यापासून विकास होतोय. पायाभूत सुविधा, जीडीपीसोबत संपूर्ण देशाचा विकास होतोय. आपल्याला अशाच नेत्याची गरज आहे. काही गोष्टी खटकतात पण शेवटी विकास महत्वाचा, आर्थिक स्थिरता महत्वाची आहे आणि जनतेने आनंदी असणं महत्वाचं आहे.'

खुर्चीसाठीची लढाई नेमकं कोण लढणार? चित्रपटातील सत्तेसाठीच्या या लढाईत खुर्ची कोणाला मिळणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.  'खुर्ची’ हा जबरदस्त ऍक्शनचा भरणा असलेला चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होईल. ‘खुर्ची’चं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे.

टॅग्स :राकेश बापटमराठी अभिनेतामराठी चित्रपटराजकारण