Join us  

Video: राकेश अन् अक्षयचा डॅशिंग अंदाज; 'खुर्ची'चा जबरदस्त टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 1:34 PM

Khurchi Teaser: प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सत्तेसाठी मोठा रणसंग्राम होणार असल्याचं दिसून येत आहे.

मराठी कलाविश्वात सध्या अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांची निर्मिती होताना दिसत आहे. यात खासकरुन राजकारणावर आधारित सिनेमांना विशेष पसंती मिळत आहे.  'धुरळा', 'झेंडा', 'वजीर', 'देऊळ' असे कितीतरी सिनेमा राजकारणावर आधारित आहेत. यामध्येच आता खुर्ची (Khurchi) हा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे.

अभिनेता राकेश बापट (raqesh bapat), अक्षय वाघमारे (akshay waghmare) यांची मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. अंगावर काटा आणणारा असा हा टीझर असून या सिनेमात बरेच अॅक्शन सीन असल्याचं यावरुन लक्षात येतं.

टीझरची सुरुवात तुरुंगात असलेल्या एका लहान मुलापासून होते. "जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी", अशा दमदार डायलॉगने या टीझरची सुरुवात होते.  आणि, त्यानंतर एका पाठोपाठ एक जबरदस्त सीन सुरु होतात. विशेष म्हणजे सत्तेसाठी सुरु झालेलं हे वादळ शमण्याचं कोणतंही चिन्ह दिसत नसून आणखी वाढताना दिसत आहे. घातपात, रक्तपात असं बरंच काही या टीझरमध्ये दिसून येत आहे.

"नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझर पाहून तुम्हाला कल्पना आली असेल की नक्की आम्ही काय व कशा प्रकारचा राडा घातला आहे. एकूणच चित्रपट करताना खूप मज्जा आली," असं राकेश बापट म्हणाला. 

दरम्यान, १२ जानेवारी २०२४ रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर अशी स्टारकास्ट आहे.  संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत 'आराध्या मोशन फिल्म्स',’ आणि 'योग आशा फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. तर या चित्रपटाच्या कथा, पटकथा, संवाद यांची जबाबदारी संतोष कुसुम हगवणे यांनी सांभाळली आहे. तसंच सिनेमाचं दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलं आहे.

टॅग्स :सिनेमाराकेश बापटमराठी अभिनेतासेलिब्रिटी