Join us  

'आमच्यात कधीच...', रणबीर कपूरने केला वडिलांबद्दल मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 12:16 PM

नुकतेच एका कार्यक्रमात रणबीरने वडील ऋषी कपूर यांच्याबद्दल मोठा खुलासा केला.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे रणबीर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतेच 'ॲनिमल' सिनेमाची टीम हैदराबादला पोहोचली. येथे कार्यक्रमात रणबीरने वडील ऋषी कपूर यांच्याबद्दल मोठा खुलासा केला.

'ॲनिमल' हा सिनेमा वडील आणि मुलाच्या नात्यावर आहे. अनिल कपूरने रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. हैदराबादमधील प्री-रिलीज इव्हेंट दरम्यान रणबीरने ऋषी कपूर यांच्यासोबतच्या नात्यावर भाष्य केलं. तो म्हणाला, 'मी माझे वडील गमावले आहेत. पालक गमावल्यानंतर असे वाटते की आपण त्यांच्यासोबत खूप कमी वेळ घालवला आहे. मी मोठा होत असताना ते कामात व्यस्त असायचे. बहुतेक वेळा डबल शिफ्ट-ट्रिपल शिफ्टमध्ये ते शुटिंग करायचे'.

पुढे तो म्हणाला, 'आमच्यात मैत्रीचे संबंध नव्हते. आम्ही बसून बोलू शकलो नाही आणि मला या गोष्टीची खंत आहे. मी त्याचा आदर करतो, पण आम्ही कधीच मित्रांसारखे वागलो नाही. पण मला मुलगी झाली, याचा मला आनंद आहे. देव जेव्हा काही घेतो, तेव्हा तो काहीतरी परतही देतो'.

‘अ‍ॅनिमल’चे ॲडव्हान्स बुकिंगवरुन याला तगडी ओपनिंग मिळणार हे निश्चित आहे. तसंच रणबीरच्या करिअरमधील हे सर्वात जास्त ओपनिंग कलेक्शन असू शकतं. हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित क्राईम ड्रामा आहे.  १ डिसेंबर २०२३ रोजी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीऋषी कपूर