Join us  

'सेक्रेड गेम्सनंतर त्याच भूमिका...' मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडेने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 3:44 PM

'इंडस्ट्रीत अनेकांना असंच वाटलं की मी केवळ...' राजश्री देशपांडेचं वक्तव्य

मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडे (Rajashree Deshpande) सध्या तिच्या 'ट्रायल बाय फायर' या नेटफ्लिक्स वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. तिच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होत आहे. मात्र राजश्री खरंतर 'सेक्रेड गेम्स' सिरीजमधून चर्चेत आली होती. त्यात तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. या सिरीजनंतर तिला केवळ तशाच भूमिका ऑफर केल्या जाऊ लागल्या असा खुलासा तिने नुकताच केला आहे.

राजश्री म्हणाली, 'सेक्रेड गेम्सवेळीच माझी मल्याळम फिल्म एस दुर्गा ही वादात अडकली होती. त्यामुळे इंडस्ट्रीत अनेकांना असंच वाटलं की मी केवळ विवादास्पद भूमिका किंवा बोल्ड सीन्सच करणारी अभिनेत्री आहे. यानंतर मला अशाच प्रकारच्या स्क्रिप्ट मिळू लागल्या. अनेकदा तर स्क्रिप्टही मिळायची नाही थेट फोनवर सांगितलं जायचं असे असे बोल्ड दृश्य आहेत.'

ती पुढे म्हणाली, 'सध्याचं फिल्म प्रोडक्शन मॅगी सारखं झालं आहे. दोन महिन्यात एक स्क्रिप्ट लिहिली जाते. दोन महिन्यात शूट होतं. दोन महिने पोस्ट प्रोडक्शन आणि सातव्या महिन्यात फिल्म रिलीज होते. सध्या अनेक लोक हाच फॉर्म्युला वापरत आहेत. पण माझ्या मते कलेचा कोणताच फॉर्म्युला नसतो.'

राजश्रीने 'ट्रायल बाय फायर' मध्ये नीलम कृष्णमूर्तिती भूमिका निभावली आहे. यामध्ये अभय देओलचीही मुख्य भूमिका आहे. 13 जून, 1997 रोजी दुपारी 3 वाजता दिल्लीतील उपहार सिनेमामध्ये ‘बॉर्डर’ चित्रपटाचा शो सुरू असताना आग लागली. या आगीमुळे थिएटरमध्ये अडकून सुमारे 59 लोकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. तर चेंगराचेंगरीमुळे 103 जण गंभीर जखमी झाले होते. देशाच्या इतिहासातील या अत्यंत भयावह दुर्घटनेवर ही वेब सीरिज आधारित आहे.

टॅग्स :बॉलिवूडसॅक्रेड गेम्स