Join us  

राज कपूर वाट बघत बसले आणि हेमा मालिनींनी संधी मिळताच सेटवरून पळ काढला...; वाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 8:00 AM

Hema Malin : ‘सपनों का सौदागर’नंतर Raj Kapoor यांनी हेमा मालिनींना आणखी एक सिनेमा ऑफर केला होता. हा सिनेमा ऑफर झाला तेव्हा हेमा मालिनी खूश्श होत्या. चित्रपटाची कथाही त्यांना आवडली होती. पण...

राज कपूर (Raj Kapoor)  यांच्या सिनेमात काम करणं त्या काळी प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असे. राज कपूर यांच्या सिनेमातून डेब्यू म्हटल्यावर ती फार मोठी गोष्ट मानली जाई. हेमा मालिनी (Hema Malini)  यांनीही राज कपूर यांच्या ‘सपनों का सौदागर’ या चित्रपटापासून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरला सुरूवात केली होती. भलेही हेमा मालिनींचा हा डेब्यू सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण या चित्रपटानंतर हेमा मालिनींचा चेहरा सर्वांच्या डोळ्यांत भरला होता. हेमा मालिनींना घेऊन चित्रपट करायला अनेक निर्माते दिग्दर्शक उत्सुक होते. अगदी राज कपूरही हेमा मालिनींसोबत पुन्हा काम करू इच्छित होते. 

‘सपनों का सौदागर’नंतर राज कपूर यांनी हेमा मालिनींना आणखी एक सिनेमा ऑफर केला होता. या सिनेमाचं नाव होतं, ‘सत्यम शिवम सुंदरम’. हा सिनेमा ऑफर झाला तेव्हा हेमा मालिनी खूश्श होत्या. चित्रपटाची कथाही त्यांना आवडली होती. त्यांनी चित्रपट स्वीकारला आणि स्क्रिन टेस्टसाठी सेटवर गेल्या. पण हे काय, शूटींग सुरू होण्याआधीच त्या सेटवरून अक्षरश: पळून आल्यात.

हो, विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. ‘सत्यम शिवम सुंदरम’साठी हेमा मालिनी व राजेश खन्ना ही राज कपूर यांची पहिली पसंत होती. राज यांनी हेमांना हा सिनेमा ऑफर केला, तेव्हा त्यांना कथा आवडली होती. रोल आणि कथा आवडली म्हणून हेमा त्या दिवशी ‘सत्यम शिवम सुंदरम’च्या सेटवर गेल्या. हेमांना कॉस्च्युम दिला गेला आणि त्यांना तयार व्हायला सांगितलं गेलं. हेमा ड्रेसिंग रूममध्ये गेल्या आणि संधी मिळताच तिथून थेट पळून गेल्या. इकडे राज कपूर त्यांची प्रतीक्षा करत होते. खूप वेळ प्रतीक्षा केल्यानंतर त्यांनी हेमांना बोलवायला माणूस पाठवला आणि हेमा त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये नसल्याचं त्यांना कळतं. अर्थातच राज कपूर समजायचं ते समजले.

‘सत्यम शिवम सुंदरम’ हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर हेमांच्या या निर्णयामागचं कारण तुम्हीही समजू शकाल. झीनत अमान यांनी या चित्रपटात अतिशय बोल्ड भूमिका साकारली होती. त्याची चर्चा आजही होते. निश्चितपणे हेमा यासाठी तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांनी सेटवरून पळून जाणंच योग्य समजलं. हेमांनी हा सिनेमा सोडला आणि राज कपूर यांनी झीनत अमानला यासाठी साईन केलं. तिने ‘सत्यम शिवम सुंदरम’मध्ये रूपाची भूमिका इतकी लिलया पेलली, की आज ती तिच्या आयकॉनिक रोलपैकी एक मानली जाते.

टॅग्स :हेमा मालिनीराज कपूरबॉलिवूड