Join us  

२ महिन्यांत कथा लिहिली, ३३ दिवसांत शूटिंग केलं अन्...; 'असा' तयार झाला राहुल देशपांडेंचा 'अमलताश' सिनेमा

By कोमल खांबे | Published: March 12, 2024 5:17 PM

सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे मुख्य भूमिकेत असलेला 'अमलताश' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'अमलताश'चे दिग्दर्शक सुहास देसले यांनी चित्रपटाच्या निमित्ताने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला. 

सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे मुख्य भूमिकेत असलेला 'अमलताश' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातून राहुल देशपांडे पहिल्यांदाच रोमँटिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सध्या सर्वत्र अमलताश सिनेमाची चर्चा आहे. 'अमलताश'चे दिग्दर्शक सुहास देसले यांनी चित्रपटाच्या निमित्ताने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधला. 

सुहास देसले म्हणाले, "जेव्हा आम्ही हा सिनेमा करायचं आहे असं ठरलं त्यानंतर पुढच्या दोन महिन्यांत आम्ही स्क्रिप्ट लिहिली. त्यानंतर आम्ही प्री पॉडक्शन सुरू केलं. ते जवळपास चार ते सहा महिने सुरू होतं. या सगळ्या गोष्टींनंतर मग दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत ३३ दिवसांत अमलताश सिनेमाचं शूटिंग केलं. सिनेमाच्या शूटिंग दरम्यान आम्हाला मोठा ब्रेक घ्यावा लागला. कारण, या सिनेमात जॅमिंग सेशन आहेत. इथे सगळे म्युजिशियन्स एकत्र परफॉर्म करतात. आणि ते लाइव्ह रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. त्यामुळे फक्त कलाकारच नव्हे तर कॅमेरामॅनपासून ते रेकॉर्डिस्टपर्यंत सेटवरील प्रत्येक व्यक्तीबरोबर आम्ही एक महिना तयारी केली. त्यानंतर आम्ही पुन्हा राहिलेला सिनेमा शूट केला. त्यानंतर सिनेमा एडिट होण्यासाठी एक वर्ष लागलं. या सिनेमातील गाणीही आम्ही लाइव्ह लोकेशनला शूट केली आहेत. सिनेमातील गाण्यांना प्लेबॅक दिलेला नाही." 

'अमलताश' सिनेमा ८ मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.  या सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. या सिनेमात राहुल देशपांडे यांच्याबरोबर अभिनेत्री पल्लवी परांजपे मुख्य भूमिकेत आहे. त्याबरोबरच दीप्ती मते, भूषण मते, त्रिशा कुंटे, प्रतिभा पाध्ये, जेकब पणीकर, ओमकार थत्ते हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

टॅग्स :राहुल देशपांडेमराठी अभिनेतासिनेमा