Join us  

'लग्नात माझी फसवणूक झाली'; पहिल्यांदाच प्रतिकने सांगितलं घटस्फोटामागील कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 4:24 PM

Prateik babbar: घटस्फोटानंतर प्रतिक अभिनेत्री प्रिया बॅनर्जी हिला डेट करत आहे.

बॉलिवूड अभिनेता प्रतिक बब्बर यानेही आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात पदार्पण केलं. मात्र, राज बब्बर वा स्मिता पाटील यांना जी लोकप्रियता मिळाली ती अद्याप प्रतिकला मिळालेली नाही. त्यामुळे असंख्य सिनेमा करुनही म्हणावा तसा तो प्रसिद्धीझोतात आलेला नाही. सध्या प्रतिक त्याच्या खासगी जीवनामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच प्रतिक आणि त्याची बायको कायदेशीररित्या विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटाचा अनेक उलटसुलट चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र, या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच प्रतिकने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिकने २०१९ मध्ये फिल्म मेकर सान्या सागर हिच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, अवघ्या ४ वर्षात त्यांचा संसार मोडला. लग्नाला १ वर्ष पूर्ण होत नाही तोच २०२०मध्ये ते स्वतंत्र राहू लागले होते. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये प्रतिकने कायदेशीर पद्धतीने सान्यापासून घटस्फोट घेतला.सान्यासोबत विभक्त झाल्यानंतर प्रतिक प्रिया बॅनर्जीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी प्रतिकने 'टाइम्स ऑफ इंडिया' दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

"आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो म्हणूनच तर लग्न केलं होतं. त्या नात्याचा मला आदर सुद्धा आहे. पण, आम्ही दोन वेगवेगळे लोक आहोत. आमच्याकडे एकमेकांना समजून घेण्याइतपत वेळही नव्हता. मला असं वाटतंय लग्न असो वा अन्य काही कोणता ही निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांविषयी जाणून घेणं फार गरजेचं आहे", असं प्रतिक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "आमचं लग्न फार घाई गडबडीत झालं. कुटुंबाकडूनही दबाव होता. मी ३२ वर्षांचा होता आणि मला वयाच्या ३५ व्या वर्षापर्यंत मूल हवं होतं. आम्ही असं ठरवलं होतं की आमच्या नात्यात आम्ही प्रेम आणि Compatibility यांची सांगड घालू. पण, ठरवल्याप्रमाणे काही झालं नाही. तुम्हाला सुरुवातीलाच काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. मला असं जाणवलं की, या लग्नात माझी फसवणूक झाली आहे. आणि, जर हे लग्न मोडलं नसतं तर मी त्या मुलीला भेटू शकलो नसतो जी आज माझ्या आयुष्यात आहे."

दरम्यान, प्रतिक सध्या अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत आहे. जवळपास ३ वर्षांपासून तो प्रियाला डेट करत असून याच वर्षी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एकमेकांवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली.

टॅग्स :प्रतीक बब्बरस्मिता पाटीलराज बब्बरबॉलिवूडसेलिब्रिटी