Join us  

'टायटॅनिक' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ७९ व्या वर्षी निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 9:18 AM

'टायटॅनिक' या गाजलेल्या हॉलिवूड सिनेमातील एका लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाल्याची बातमी समोर येतेय

'टायटॅनिक' चित्रपट माहित नाही असा एकही माणूस आढळणार नाही. याच सिनेमात कॅप्टन एडवर्ड जॉन स्मिथ ही भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते बर्नार्ड हिल यांचं निधन झालंय. वयाच्या ७९ व्या वर्षी बर्नार्ड यांनी अखेरचा श्वास घेतला. ही दुःखद बातमी बर्नार्ड हिलची को-स्टार बार्बरा डिक्सन यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. बर्नार्ड यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.

सहअभिनेत्रीने सांगितली दुःखद बातमी

बार्बरा डिक्सन यांनी ट्विटर X वर एक पोस्ट शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बर्नार्ड हिल यांच्या निधनाची बातमी मी अत्यंत दुःखद भावनेने शेअर करत आहे. आम्ही जॉन पॉल, जॉर्ज रिंगो आणि बर्ट या विली रसेलच्या शोमध्ये 1974-1975 मध्ये एकत्र काम केले. तो खरोखर एक अप्रतिम अभिनेता होता. RIP बर्नार्ड हिल.' ही बातमी कळताच चाहत्यांनी 'टायटॅनिक' फेम अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.

बर्नार्ड हिल यांची सिनेकारकीर्द

बार्बरा डिक्सन आणि बर्नार्ड हिल यांनी 'जॉन, पॉल, जॉर्ज, रिंगो... आणि बर्ट' या संगीतमय चित्रपटात एकत्र काम केले. विली रसेल दिग्दर्शित हा चित्रपट द बीटल्सच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट 1974 मध्ये प्रदर्शित झाला होता. 'टायटॅनिक' आणि 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज: द टू टॉवर्स' अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये बर्नार्ड हिलने काम केलं. याशिवाय 'द स्कॉर्पियन किंग', 'द बॉईज फ्रॉम काउंटी क्लेअर', 'गोथिका', 'विम्बल्डन', 'द लीग ऑफ. जेंटलमेन अपोकॅलिप्स', 'जॉय डिव्हिजन', 'सेव्ह एंजेल होप', 'एक्सोडस' आणि 'वाल्कीरी' अशा सिनेमांत ते झळकले. 

टॅग्स :हॉलिवूडमराठी