Join us

दुबळ्या सोंगट्या, ढिसाळ चाली

By admin | Updated: January 9, 2016 10:42 IST

नव्या वर्षाचा पहिला मोठा चित्रपट ‘वजीर’ हा पटकथा आणि दिग्दर्शन यामुळे सामान्य प्रेक्षकांच्या कल्पना व आकलनाला चालना देणारा आहे.

- अनुज अलंकार

नव्या वर्षाचा पहिला मोठा चित्रपट ‘वजीर’ हा पटकथा आणि दिग्दर्शन यामुळे सामान्य प्रेक्षकांच्या कल्पना व आकलनाला चालना देणारा आहे. विधू विनोद चोप्रा यांची निर्मिती व बिजॉय नांबियार यांचे दिग्दर्शन असलेला ‘वजीर’ बुद्धिबळाच्या खेळासारखा शह आणि काटशह यांचे दर्शन घडविणारा आहे.कथा आहे दिल्लीतील. दहशतवादविरोधी तुकडीतील पोलीस अधिकारी दानिश अली (फरहान अख्तर) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये आपल्या मुलीचा नूरीचा जीव गमावतो. दानिशची पत्नी रोहानी (आदिती राव हैदरी) नूरीच्या मृत्यूला पतीच जबाबदार असल्याचे समजते व त्याच्यापासून दूर राहू लागते. दानिश नूरीच्या मारेकऱ्यांना धडा शिकविण्यात यशस्वी ठरतो, परंतु त्याला नोकरीतून निलंबित केले जाते. या दरम्यान दानिशच्या जीवनात ओंकारनाथ धर ऊर्फ पंडितजी (अमिताभ बच्चन) येतात. दोन्ही पाय गमावलेले पंडितजी लहान मुलांना बुद्धिबळ शिकवत असतात. त्यांच्याकडे नूरीदेखील ते शिकायला जात असे. पंडितजींनी स्वत:च्या मुलीलाही गमावलेले असते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मुलीचा मृत्यू काश्मीरहून येणारे केंद्रीय मंत्री कुरेशी (मानव कौल) यांच्या घराच्या पायऱ्यांवरून घसरल्यामुळे झाला होता. पंडितजींची मुलगी कुरेशींच्या मुलीची मैत्रीण होती. आपल्या मुलीचा मृत्यू कुरेशीमुळे झाला, असा पंडितजींचा समज असला तरी पोलीस त्यांचे काही एक ऐकायला तयार नाहीत. दानिश आणि पंडितजींची लवकरच मैत्री होते. बुद्धिबळाचा खेळ खेळताना दोघेही आपापल्या मुलींच्या मृत्यूचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. पंडितजींच्या प्रयत्नांमुळे दानिश आणि रोहानी यांच्यातील दुरावा कमी होऊन ते दोघे परत एकत्र येतात. पंडितजींच्या मुलीच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी दानिश पुढाकार घेतो व कुरेशीच्या जवळ जायचा प्रयत्न करतो तेव्हा पंडितजींवर गंभीर स्वरूपाचा हल्ला होतो. कुरेशी दिल्लीहून काश्मीरला निघून जातो. पंडितजीही सूड घेण्यासाठी काश्मीरला जायचा प्रयत्न करतात, पण तसे होत नाही. दानिश काश्मीरला जाण्यात यशस्वी ठरतो व तेथे कुरेशीचा खरा चेहरा समोर येतो आणि पंडितजींवर गंभीर स्वरूपाचा हल्ला कोणी केला होता याचा आणि बुद्धिबळात शह आणि काटशह देण्याचा खेळ कसा सुरू होता याचाही खुलासा होतो.उणिवा : स्वत: विधू विनोद चोप्रा चित्रपटाच्या लेखकांपैकी एक आहेत व लेखन हीच ‘वजीर’ची दुबळी बाजू आहे. चित्रपटाचे नाव ‘वजीर’, कथेचा आधार बुद्धिबळाचा खेळ. परंतु खूपच दुबळे मोहरे आणि तशाच चाली असल्यावर बुद्धिबळाचा डाव जसा कमकुवत करतात तेच ‘वजीर’चे झाले आहे. मुन्नाभाईची मालिका, थ्री इडियट्स आणि पीकेसारख्या चित्रपटांचे लेखक अभिजित जोशी आणि चोप्रा यांनी लिखाणात अशा काही कसरती केल्या आहेत की प्रेक्षकांसाठी त्याचे आकलन करणे हे आव्हान आहे.विशेषत: ज्या पद्धतीने वजीरचे मूळ रूप समोर आणण्यात आले ते कल्पनातीत आहे. बिजॉय नांबियार यांनी सामान्य प्रेक्षकांसाठी नव्हे तर अतिउच्च आकलन क्षमता असलेल्या प्रेक्षकांसाठी वजीर बनवला असावा. ‘वजीर’ची संपूर्ण रचना सरळ सोपी नसण्याला नांबियार यांचे दिग्दर्शन कारणीभूत आहे.अभिनयाचा विचार केला तर ‘भाग मिल्खा भाग’सारखा दर्जेदार चित्रपट बनविणारा फरहान अख्तर येथे खूपच वेगळ्या भूमिकेत आहे व त्याच्या अभिनयातही ती चमक नाही. आदिती राव हैदरीचा वापर केवळ ग्लॅमगर्ल म्हणूनच झाला आहे. तिच्या भूमिकेला काही आधार नाही. कुरेशीच्या भूमिकेत मानव कौल अतिनाटकी अभियानाचा बळी ठरला आहे. पाहुण्या कलाकारांच्या भूमिकांमध्ये जॉन अब्राहम आणि नील नितीन मुकेश आहेत. चित्रपटात संगीतकारांच्या अनेक तुकड्या असल्याचा परिणाम अनवट आहे. मध्यंतरापर्यंत चित्रपट बुद्धिबळाच्या डावासारखा सावधपणे पुढे सरकतो. रहस्यमय व थ्रिलर चित्रपटाप्रमाणे मध्यंतरानंतर ‘वजीर’ला गती आहे.

वैशिष्ट्ये : अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा पंडितजींच्या भूमिकेत चित्रपटाला दर्जा बहाल करण्याचा प्रयत्न केला आहे. दमदार आवाज आणि अभिनयासोबत त्यांनी उत्तम काम केले आहे, परंतु त्यांची भूमिका दुबळीच ठेवण्यात आली आहे. परंतु हीच चित्रपटाची जमेची बाजू ठरली आहे.