पाहा: जेव्हा 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर श्रीदेवीने या मराठी गाण्यावर धरला ताल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 12:13 IST
ऐंशी आणि नव्वदचं दशक ज्या अभिनेत्रींनी गाजवलं त्यात अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे श्रीदेवी. 'सदमा', 'चांदनी'मधील संवेदनशील भूमिका असो की ...
पाहा: जेव्हा 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर श्रीदेवीने या मराठी गाण्यावर धरला ताल
ऐंशी आणि नव्वदचं दशक ज्या अभिनेत्रींनी गाजवलं त्यात अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे श्रीदेवी. 'सदमा', 'चांदनी'मधील संवेदनशील भूमिका असो की 'चालबाज'मधील बिनधास्त भूमिका या तेवढ्याच सक्षमपणे सांभाळणारी अभिनेत्री अशी तिची ओळख. लग्नानंतर काही काळ अभिनयापासून दुर गेलेल्या श्रीदेवीने दोन वर्षांपूर्वी आलेल्या 'इंग्लीश विंग्लीश' चित्रपटातून सिनेसृष्टीत पुनरागमन केलं आणि आता 'मॉम' या चित्रपटातून ती परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने श्रीदेवी 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आली होती.यावेळी थुकरटवाडीच्या मंडळीने सादर केलेल्या 'नागिन' चित्रपटाच्या स्किटवर श्रीदेवीने खळखळून हसत दाद दिली.याशिवाय 'इंग्लीश विंग्लीश' सारखा मराठी बिराठीचा क्लासही या मंचावर भरविण्यात आला आणि त्यानेही उपस्थितांना खळखळून हसविले. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकीचा मराठीचा आगळा वेगळा वर्ग घेण्यात आला ज्यात त्यानेही धम्माल उडवून दिली. याशिवाय पोस्टमन काकाने एका पत्रातून एका मुलीच्या आपल्या आईप्रतीच्या भावना वाचून दाखवल्या आणि ते ऐकून श्रीदेवीही हळवी झाली.प्रेक्षकांना ही सगळी धमाल येत्या सोमवारी आणि मंगळवारी प्रसारित होणा-या भागांत बघायला मिळणार आहे. यावेळी श्रीदेवीसह नवाजुद्दीन सिद्दीकीनेही या सिनेमाविषयी काही गोष्टी रसिकांसह शेअर केल्या, मॉम सिनेमातील नवाजुद्दीने लूकची खूप चर्चा होत आहे.याविषयी बोलताना त्याने सांगितले की, आम्ही वेगवेगळे लूक ट्राय केले. ती व्यक्तीरेखा कशी असेल, त्याचे बोलणे आणि चालणे तसंच हावभाव या सगळ्या गोष्टी आम्ही पडताळून पाहिल्या आणि लूकवर शिक्कामोर्तब झालं. मेकअपसाठी आम्ही प्रोस्थेटिकचा वापर केला आणि सगळ्या प्रक्रियेसाठी जवळपास तीन तास जात असत आणि मेकअप काढण्यासाठी तेवढाच वेळ लागायचा. मुंबई आणि दिल्लीच्या कडाक्याच्या उन्हात त्या मेकअपसह वावरायचो.सिनेमाप्रमाणेच लूकविषयी जास्त चर्चा होत असल्यामुळे यातच हा प्रयोग यशस्वी ठरत असल्याचा आनंद वाटत असल्याचे त्याने सांगितले.