नाशिकमधील घटना : संजय दत्तने चक्क उपसली होती तलवार; म्हटले देवाची शप्पथ आता एकालाही सोडणार नाही !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 17:50 IST
सध्या अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती केली जात असून, यामध्ये त्याच्या खासगी आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. ...
नाशिकमधील घटना : संजय दत्तने चक्क उपसली होती तलवार; म्हटले देवाची शप्पथ आता एकालाही सोडणार नाही !
सध्या अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती केली जात असून, यामध्ये त्याच्या खासगी आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. लहानपणापासून ते ड्रग एडिक्टपर्यंतचा संजूबाबाचा प्रवास यात दाखविण्यात येणार आहे. ९०च्या दशकात जेव्हा संजूबाबा दारू आणि ड्रग्जच्या आहारी गेला होता तेव्हा त्याची छबी मलिन झाली होती. अशात तो एकदा नाशिक येथे ‘जीने दो’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. त्यावेळी संजूबाबाला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक आले होते. त्यातील काही टवाळखोरांनी संजूबाबाच्या पर्सनल लाइफवर कमेंट केल्या. मग काय, संजूबाबा असा काही भडकला की, चक्क तलवार उपसून तो लोकांना मारायला निघाला होता. देवाची शप्पथ, आता एकलाही सोडणार नाही, असेच काहीसे शब्द पुटपुटत तो या टवाळखोरांच्या पाठीमागे लागला होता. मात्र सेटवरील लोकांनी त्याला अडवित त्याचा राग शांत केला होता. १९९०ची ही गोष्ट आहे. नाशिकमध्ये ‘जीने दो’ या चित्रपटातील काही सीन्स शूट करायचे होते. बरेचसे सीन्स गर्दीच्या ठिकाणचे होते. संजूबाबा एखाद्या शॉटला सुरुवात करताच काही टवाळखोर त्याच्यावर पर्सनल कॉमेण्ट करून त्याला डिवचत होते. काहींनी तर चक्क त्याच्या अभिनयाची खिल्ली उडविली होती. जोर-जोरात ओरडून ‘तुझी अॅक्टिंग खराब आहे’ अशा शब्दांमध्ये त्याला हिणवत होते. काहींनी त्याच्या फॅमिलीला शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. केवळ संजूबाबालाच नव्हे तर फराह आणि सोनम या अभिनेत्रींनाही या टवाळखोरांनी टारगेट केले होते. त्यांच्यावरही वाईट साईट कॉमेण्ट करून त्यांना शिवीगाळ करीत होते. जेव्हा या टवाळखोर ग्रुपचा टारगटपणा वाढत गेला तेव्हा संजूबाबाचा राग अनावर झाला. त्याने अगोदर या टवाळखोरांना चेतावणी दिली होती. मात्र गर्दीतील एका ग्रुपने संजूबाबाची चेतावणी मान्य करीत ‘हिम्मत असेल तर शूटिंग सोडून बाहेर ये, मग तुला कळेल खरा हिरो कोण?’ असे म्हटले. मग संजूबाबाचा पारा आणखीनच चढला. तो त्यांना प्रत्युत्तर देईल तेवढ्यात सेटवरील लोकांनी त्याला शांत केले. मात्र लोकांच्या कॉमेण्ट थांबतच नसल्याने त्याला शॉट देण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. त्याला खूपच डिस्टर्ब होत होते. अखेर निर्मात्यांनी त्या दिवसाची शूटिंग थांबविण्याचा निर्णय घेतला. संजूबाबा हॉटेलमध्ये निघून गेला. दुुसºया दिवशी जेव्हा संजूबाबा सेटवर पोहोचला तेव्हा तोच टवाळखोरांचा ग्रुप अगोदरच शूटिंगस्थळी संजूबाबाची प्रतीक्षा करीत होता. यावेळेस कालच्यापेक्षा अधिक टवाळखोर या ग्रुपमध्ये होते. अशात संजूबाबाला स्वत:वर संयम ठेवणे आणि पूर्णपणे लक्ष केंद्रित करून शॉट देणे अशक्य होते. मात्र यादिवशी दुपारपर्यंतच शूटिंग असल्याने संजूबाबाने झटपट त्याचे शॉट पूर्ण केले. परंतु जेव्हा तो हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा त्याला सातत्याने या टवाळखोरांचे कॉमेण्ट आठवत होते. त्यामुळे तो खूपच त्रस्थ असल्याचेही दिसत होता. फायनली त्याने या टवाळखोरांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. दुसºया दिवशी संजूबाबा सकाळीच शूटिंगच्या सेटवर पोहोचला. यावेळी तो टवाळखोरांचा ग्रुप त्याठिकाणी नव्हता. मात्र संजूबाबा त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करीत होता. काही वेळानंतर तो ग्रुप त्याठिकाणी पोहोचला. त्यांनी पुन्हा संजूबाबावर गलिच्छ कॉमेण्ट करण्यास सुरुवात केली. संजूबाबाला भडकाविण्याची एकही संधी हा ग्रुप सोडत नव्हता. मात्र यावेळेस संजूबाबानेही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे ठरविले होते. संजूबाबाने त्या ग्रुपकडे बोलताना म्हटले की, ‘तुम्हाला माझ्याशी वाद घालायचा असेल तर शूटिंगच्या ठिकाणापासून दुसरीकडे चला.’ मात्र हा टवाळखोरांचा ग्रुप संजूबाबाच्या या आव्हानावर हसायला लागला. त्याची पुन्हा खिल्ली उडविण्याचा सिलसिला सुरूच ठेवला. मग काय, संजूबाबाने एक चकाकणारी तलवार उपसली अन् या टवाळखोरांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी संजूबाबाने अंगावरील शर्टही काढला अन् भारीभक्कम आवाजात ओरडत टोळक्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. यावेळी संजूबाबाने म्हटले, ‘हिम्मत असेल तर या सामना करा, देवाची शप्पथ आज एकालाही सोडणार नाही.’ संजूबाबाचा हा अवतार बघून सेटवरील सर्वच दंग राहिले. निर्माते अन् अन्य टीमने त्याच्या दिशेने धाव घेतली. दहा मिनिटांतच सर्व वातावरण शांत झाले. कारण टवाळखोरांच्या या ग्रुपने अशी काही धूम ठोकली की, पुन्हा ते कधीच शूटिंगच्या ठिकाणी परतले नव्हते. पुढे संजूबाबाने शूटिंगला सुरुवात केली. त्यानंतर मात्र त्याच्यावर कोणीही गलिच्छ कॉमेण्ट केल्या नाही. असे करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास, तो चक्क तलवार उपसायचा. पुढे ही भीती लोकांच्या मनातच बसली होती. त्यामुळे संजूबाबाची शूटिंग बघण्यासाठी येणारे कोणीच त्याच्यावर कॉमेण्ट करीत नव्हते.