ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3- मुलगा हॉस्पिटलमध्ये सोडून निघून गेल्यामुळे एक महिन्यापासून हॉस्पिटलमध्येच रहावं लागलेल्या पाकिजा फेम अभिनेत्री गीता कपूर यांना अखेरीस डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्यात आलं आहे. गीता कपूर यांच्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून तिथून पळ काढला होता. त्यानंतर सिनेनिर्माते अशोक पंडित आणि रमेश तौरानी यांनी गीता यांचं हॉस्पिटलमधील दीड लाखांचं बीलसुद्धा भरलं. आता गीता कपूर यांना अंधेरीतील जीवन आशा वृद्धाश्रमात ठेवण्यात आलं आहे.
आपल्या आजारी आईला हॉस्पिटलमध्ये एकटं सोडून जेव्हा त्यांचा मुलगा बिल न भरता तिथून निघून गेला तेव्हा सर्वांना गीता कपूर यांच्या दयनीय अवस्थेची कल्पना आली. गीता यांचा मुलगा त्यांना रुममध्ये कोंडून मारहाण करायचा आणि चार पाच दिवसांमध्ये कधी तरी जेवण द्यायचा. तो स्वतः बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर आहे. मुंबईमध्येच गीता यांची मुलगी राहते ती एअर होस्टोस आहे. पण तिसुद्धा आईकडे लक्ष देत नव्हती..
मीडियामध्ये गीता कपूर यांच्या परिस्थीतीची बातमी आल्यानंतर बॉलिवूडमधून अनेकांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. अशोक पंडीत आणि रमेश तौरानी यांच्यासोबतच रितेश देशमुखनेही त्यांना आर्थिक मदत केली आहे. दरम्यान, कपूर यांच्या दोन्ही मुलांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. गीता यांच्या मुलाने तर त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याची परवानगीही नाकारली होती. पण गीता कपूर यांना वृद्धाश्रमात दाखल करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र दिल्याबद्दल पंडित यांनी ट्विटद्वारे मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. "गीता पुन्हा हसत आहेत आणि लवकरच त्या पूर्ण बऱ्या होतील.’ असं अशोक पंडित यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
Relieved after #GeetaKapoor ji is shifted to #JeevanAsha old age home, Andheri (W). She is smiling & soon will be absolutely fine.