Join us

ऑस्करचा गड गेला पण 'सिंह' आला!

By admin | Updated: March 1, 2017 21:51 IST

मुंबईच्या कलिनामध्ये कुंची कुर्वे , गल्ली नंबर 2, सेंट मेरी हायस्कूलच्या बाजूला.... असा पत्ता कुठे आहे हे विचारलं तर मुंबईकरांच्याही कपाळावर आठ्या पडतात.

सागर सिरसाट / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - मुंबईच्या कलिनामध्ये 'कुंची कुर्वे , गल्ली नंबर 2, सेंट मेरी हायस्कूलच्या बाजूला'.... असा पत्ता कुठे आहे हे विचारलं तर मुंबईकरांच्याही कपाळावर आठ्या पडतात. थेट कलिनामध्ये जाऊनही हा पत्ता विचारला तरी कोणाला लक्षात येत नाही. मात्र, तेथे जाऊन सनी पवारचं घर कुठेय असं विचारलं तर थेट घरापर्यंत पोहोचवलं जाईल इतका हा सनी पवार प्रकाशझोतात आला आहे. 
 
वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी ऑस्करवारी करणारा हा मराठमोळा चिमुकला जगभरात सध्या चर्चेचा विषय आहे. ‘लायन’ चित्रपटात लहानग्या 'सरू'ची भूमिका साकारुन जगभरातील सिनेरसिकांना त्याने आपल्या प्रेमात पाडलं. दोन दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या 89 व्या ऑस्कर सोहळ्यात मूळ भारतीय अभिनेता देव पटेलसोबत सनी पहिल्यांदा रेड कार्पेटवर उतरला आणि सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनला. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये चुपचाप बसलेल्या सनीवर ऑस्कर पुरस्काराचा होस्ट जिमी किमेलची नजर गेली व न राहावून प्रेक्षकांमध्ये जात त्याने सनीला कडेवर घेतले. लायन  सिनेमातील एक सीन सनीसोबत करण्याचा त्याने प्रयत्न केला. कलिना ते ‘लायन’ व्हाया ऑस्कर असा सनीचा प्रवास खरंच उल्लेखनीय आहे.  पुरस्कार मिळाला नसला तरी त्याने सर्वांची मनं जिंकली! 
 
ऑस्कर सोहळ्यात भारतीयांची मान उंचावणारा सनी बुधवारी मायभूमी मुंबईत परतला. त्यानंतर सनीला भेटायला, बघायला आणि त्याची मुलाखत घ्यायला अगदी झुंबडच उडालीये.  ‘मी ऑस्कर सोहळ्यातील व्यासपीठावर खूप मजा केली. सध्या मी खूप आनंदी असून या पुरस्कारावेळी व्यासपीठावरील उपस्थिती अविस्मरणीय होती’, असे सनी पवारने मुंबई विमानतळावर दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. 
 
इतक्या लहान वयात महाशक्तीशाली अमेरिकेचे दोन माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि बिल क्लिंटन यांची त्याने भेट घेतली. त्यांना भेटल्यावर काय म्हणाला असं त्याला विचारलं तर, 'अंकल'ला नमस्ते केलं असं तो अगदी निरागसपणे सांगतो. इयत्ता तिसरीत शिकणा-या सनीला 'डब्ल्यूडब्ल्यूई' खूप आवडतं. त्यामधील त्याचे दोन आवडते हिरो 'द रॉक' आणि ब्रॉक लेस्नर यांनाही भेटायची संधी त्याला मिळाली. 
 
हिंदी चित्रपटांमध्ये त्याचा आवडता चित्रपट क्रिश असला तरी आवडता हिरो मात्र, अजय देवगण असल्याचं तो म्हणतो. त्यातही सिंघममधील अजयची भूमिका त्याची आवडती. थोडक्यात काय? तर सुपरहिरो त्याला जाम आवडतात. आता सुपरहिरो आवडतात म्हटल्यावर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतही आवडणारच की.  रजनीचाही तो खूप मोठा फॅन आहे. इतके पुरूष आयकॉन असणा-या या चिमुकल्याला महिला अभिनेत्री कोण आवडते म्हटल्यावर चक्क कोणीच नाही असं तो म्हणतो. 
मुंबईचा आहे म्हटल्यावर अर्थात क्रिकेटपण आवडणारच. लायनमधील मुख्य अभिनेत्री निकोल किडमॅनलाही या पट्ठ्याने क्रिकेट शिकवल्याचं तो सांगतो. तिच्याबरोबर जितक्या वेळेस खेळलो तितक्यांदा मीच जिंकलो, निकोलला चांगली बॅटिंग करता येत नाही असंही त्याने सांगून टाकलं. बरं, तिसरीत शिकणा-या या मुलाला इतक्या सुट्ट्या कशा मिळतात असं त्याला विचारलं तर शाळेत सुट्टीचं अॅप्लिकेशन टाकून जातो असं तो हसत हसत म्हणतो. 
 
चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर,  लायनमध्ये छोट्या सरूची त्याने केलेली भूमिका काळजाचा ठाव घेणारी आहे. चित्रपटात सरू ब्रायरर्ली या मूळ भारतीय असलेल्या पण ऑस्ट्रेलियन दाम्पत्याने दत्तक घेतल्यामुळे तिथेच लहानाचा मोठा झालेल्या तरुणाची सत्यकथा आहे. सिनेमातील आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सनीने समिक्षकांचीही मनं जिंकली, त्याला पुरस्कार न मिळाल्याने काहींनी हळहळही व्यक्त केली. असो...त्या निमित्ताने भारताला भविष्यातील नवा तारा मिळाला हे खरंय. म्हणून तर ऑस्करचा गड गेला पण सिंह आला असंच म्हणावं लागेल. 
 
जेमतेम परिस्थीती असून आई वडिलांचा पाठिंबा असेल तर सर्वकाही मिळवता येतं आणि मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हेच या छोट्या 'लायन'ने दाखवून दिलं.