आजोबा आणि नातू यांच्या भावनिक संघर्षावर भाष्य करणाऱ्या ‘श्वास’ चित्रपटाने मराठी रसिकांची मने जिंकली. या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना केवळ ऊर्जितावस्थाच आली नाही तर ‘श्वास’ने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘आॅस्कर’ समितीलादेखील दखल घेण्यास भाग पाडले. या चित्रपटाच्या प्रभावातून ही मंडळी अद्यापही बाहेर आलेली नाहीत. ११ वर्षांनंतर त्यांच्या मनात हा ‘श्वास’ कायम आहे. याचा प्रत्यय मराठी कलाकारांना नुकत्याच झालेल्या इफ्फीमध्ये आला. आॅस्कर समितीने अधिकृत भेट दिलेला हा पहिलाच चित्रपट महोत्सव ठरल्याने भारतीयांसाठीही त्यांची उपस्थिती हा अभिमानाचा क्षण ठरला.गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) इतिहासात आॅस्करने प्रथमच त्यांचे शिष्टमंडळ महोत्सवासाठी पाठविले होते. यासाठी एसएमपीटीईचे भारत विभागाचे संचालक डॉ. उज्ज्वल निरगुडकर खूप प्रयत्न करीत होते. योग्य समन्वयामुळे आॅस्करच्या संचालक मंडळाने तीन सदस्यांचे मंडळ अधिकृतरीत्या इफ्फीला पाठविले. या शिष्टमंडळात मिल्ट शेफटर (संचालक, अॅकॅडमी सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी कौन्सिल), मार्क म्याँजिनी, (साऊंड एडिटर, डिझायनर) आणि हुम्पी डिक्सन (एडिटर, युके) यांचा समावेश होता. जागतिक स्तरावर जो पुरस्कार प्रतिष्ठित मानला जातो त्या आॅस्करच्या शर्यतीतही ‘श्वास’ चित्रपट होता. ‘श्वास’ला आॅस्कर मिळाला नसला तरी आॅस्कर समितीला मात्र या चित्रपटाने भारावून टाकले. या दौऱ्याविषयी डॉ. उज्ज्वल निरगुडकर सांगतात, ‘‘आॅस्करची समिती इफ्फीमध्ये यावी, ही शासनाची व इफ्फीची खूप वर्षांपासूनची इच्छा होती. त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. चित्रपट क्षेत्रात जगात काय चालू आहे, आपल्या चित्रपट व्यवसायाची भव्यता आॅस्कर समितीला दाखविणे तसेच आपल्या चित्रपटांकडे ते कसे पाहतात व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे हा त्यामागील हेतू होता. समितीला महोत्सव आवडला. भारतीय चित्रपटांचे त्यांनी कौतुक केले. ‘श्वास’ अजूनही आमच्या मनात असल्याचे तेव्हाचे परीक्षक मिल्ट शेफ्टर यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर परशा होडीतून येतो, या शेवटच्या प्रसंगाचे शेफ्टर यांनी रसभरित वर्णन केले. ‘श्वास’मुळे भारतीय चित्रपटांकडे आम्ही वेगळ्या नजरेने पाहू लागलो. भारतीय चित्रपटांमध्ये प्रचंड क्षमता आहे. आॅस्करसाठी भारतीय चित्रपटकर्त्यांनी आधीपासून कामाला लागावे. चित्रपटाचे प्रमोशन केले तर सर्व परीक्षकांना चित्रपट पाहता येईल, त्यामुळे आॅस्करची वाट सोपी होईल, असा सल्ला शेफ्टर यांनी दिल्याचे डॉ. निरगुडकर स्पष्ट करतात.
‘श्वास’ अजूनही घालतोय आॅस्कर समितीच्या मनात रुंजी
By admin | Updated: December 6, 2015 03:07 IST