ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 25 - लाखो दृष्टीहीन व्यक्तींना नवदृष्टी देणारे लातूरचे भूमिपुत्र आणि जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.तात्याराव लहाने यांच्यावर लवकरच मराठी सिनेमा येत आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच प्रशासकीय सेवेतील एखाद्या डॉक्टरवर बायोपिक येत आहे. विशेष म्हणजे हा मान मिळवणारे लहाने हे लातूर जिल्ह्यातील पहिलेच व्यक्तिमत्त्व. डॉ. लहाने यांचा जीवन संघर्ष व त्यानंतर त्यांची सर्वांसमोर आलेली यशोगाथा या सिनेमात पाहायला मिळेल, अशी माहिती निर्माता दिग्दर्शक विराग वानखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रेणापूर तालुक्यातील माकेगाव येथील मूळ रहिवाशी असलेले डॉ. तात्याराव लहाने यांचा लहानपणीचा जीवन प्रवास हा अनेकांना माहित नाही. आज त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव होत असला तरी त्यांच्या बालपणाचा संघर्ष सर्वांना माहीत व्हावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी, उद्देशानं सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे वानखेडे म्हणाले.
'नेत्रदान मोहिमेचे महत्त्व सर्वांना समजण्यासाठी आपण 100 दिवस डोळ्यावर पट्टी बांधण्याचा उपक्रम घेतला. डॉ. लहाने यांच्या समवेत दोन वर्षे राहून त्यांच्या प्रत्येक कार्याची माहिती घेतली. डॉ.लहाने यांच्या घरची परिस्थिती अत्यंत खडतर असतानाही त्यांनी त्यावर मात केली. त्यातच किडनीचा आजार उद्भवल्याने आईने त्यांना आपली किडनी देऊन पुनर्जन्म दिला. या महत्त्वाच्या बाबी आजच्या पिढीला माहीत नाहीत. ही माहिती सर्वांना मिळावी, म्हणून ‘डॉ.तात्या लहाने अँगर पॉवर इज विदिन’ या मराठी सिनेमाची निर्मिती करीत आहोत, अशी माहिती वानखेडे यांनी दिली.
या सिनेमात अभिनेता मकरंद अनासपुरे, अलका कुबूल, निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव असे दिग्गज कलाकार आहेत. येत्या 8 सप्टेबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.यापूर्वी समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांच्यावर ‘प्रकाशवाटा’हा बायोपिक आला. परंतु, प्रशासकीय सेवेतील व्यक्तीवर हा पहिलाच बायोपिक आहे. डॉ. लहाने यांच्या महान कार्याची सिनेमातून सर्वसामान्यांना आणखी माहिती मिळणार आहे. आज प्रत्येक मुलगा आपल्याला हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी पालकाकडे हट्ट धरतो आणि ती मिळवितो. परंतु, डॉ.लहाने यांच्या बालपणी काहीही सुविधा नसताना त्यांना मिळविलेले यश हे सर्वांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही वानखेडे यांनी सांगितले़
तात्यारावांच्या भूमिकेत मकरंद अनासपुरे
या सिनेमात सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे हे डॉ. तात्याराव लहाने यांची भूमिका साकारात आहेत. त्यांच्या आईच्या भूमिकेत अलका कुबल तर वडिलांच्या भूमिकेत रमेश देव आहेत. निशिगंधा वाड या डॉक्टरांच्या सहकारी असून, भरत गणेशपुरे हे सास-याच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण भिवंडीवाडा, खारघर, पनवेल, आनंदवन येथे झाले आहे.
३०० कलाकारांचे रिले सिंगिंग
या सिनेमात ‘काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू’ हे गाणे गायिका साधना सरगम व विराग वानखेडे यांनी गायले आहे. या गाण्यावर आधारित ३०० कलाकारांचा रिले सिंगिंग होणार आहे. यासाठी लातूरमधील डॉ.लहाने हॉस्पिटल येथे १८ एप्रिल रोजी ऑडिशन होणार आहे.