Join us

तामिळनाडूमध्ये "बाहुबली 2" चे सुरुवातीचे खेळ रद्द

By admin | Updated: April 28, 2017 11:24 IST

तामिळनाडूमध्ये प्रमुख सिनेमागृहांमध्ये सिनेमाचे सुरुवातीचे खेळ रद्द करण्यात आले आहेत. यामुळे सिनेरसिकांमध्ये नाराजी आहे.

 ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. 28 - कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचं देशभरातील सिनेरसिकांना आज उत्तर मिळत आहे. एस.एस. राजमौली यांचा सिनेमा "बाहुबली - 2 कन्क्ल्युजन" शुक्रवारी देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, तामिळनाडूमध्ये प्रमुख सिनेमागृहांमध्ये सिनेमाचे सुरुवातीचे खेळ रद्द करण्यात आले आहेत. यामुळे सिनेरसिकांमध्ये नाराजी आहे.
 
तामिळनाडूमध्ये "बाहुबली 2" चे खेळ रद्द 
तामिळनाडूमध्ये आर्थिक कारणांमुळे एस.एस.राजामौली यांचा सिनेमा  "बाहुबली - 2 कन्क्ल्युजन"ला फटका बसत आहे. यामुळे शुक्रवारचे सकाळचे खेळ रद्द करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार "बाहुबली 2" चे निर्माते अर्का मेडीवर्क्सकडून तामिळनाडूतील वितरक के. प्रोडक्शनला 15 कोटी रुपये देणे बाकी आहेत. या कारणास्तव राज्यात तेलुगू आणि तमिळ भाषेतील सिनेमा प्रदर्शित करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. 
 
दरम्यान, एका सिनेमागृहाच्या मालकाने सांगितले की, या समस्येवर दुपारपर्यंत तोडगा निघण्याची शक्यता आहे. ही अडचण सोडवण्यासाठी संबंधितांसोबत बातचित होत असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे दुपारपर्यंत तेलुगू आणि तमिळ भाषेतील बाहुबली 2 सिनेमा प्रदर्शित होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सिनेमाचे केवळ देशातच नाही तर परदेशातही अॅडवान्स्ड बुकिंग करण्यात आले. हैदराबादमध्ये तर सिनेमा रिलीजच्या आदल्या दिवशी तिकीट मिळवण्यासाठी सकाळी-सकाळी 3 किलोमीटर लांब रांग सिनेरसिकांनी लावली होती.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदी भाषेतील "बाहुबली - 2 कन्क्ल्युजन" सिनेमाबाबत कोणतीही समस्या नाही कारण सिनेमाचे हिंदी व्हर्जन अनिल थडानी देशभरात रिलीज करत आहेत. 
 
30 सेकंदांचा सिनेमा लीक
रिलीजपूर्वीच "बाहुबली 2" सिनेमातील 30 सेकंदांचा सीन लीक झाल्याचीही बातमी आहे. 
दरम्यान, लीक झालेल्या या सीनमध्ये सिनेमासंबंधी अशी कोणतीही महत्त्वपूर्व माहिती बाहेर आल्याचे दिसत नाही. तसं पाहायला गेले तर इंटरनेटच्या या विश्वात पायरसी आणि सिनेमा लीक होणं यांसारख्या घटना नियंत्रणात आणणं जरा कठीणच आहे. 
 
सोशल मीडियावर व्हायरल झालेला क्लिपमध्ये शिवगामी दिसत आहे. हा तेलुगू भाषेतील सिनेमाचा सीन असून यात शिवगामी आपल्या मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करताना दिसत आहे. मात्र, ही क्लिप बनावट असल्याचे बोलले जात आहे. 
सिनेमाबाबत संपूर्ण देशभरात जबरदस्त क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे. केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये सिनेमा पहिला खेळ पाहण्यासाठी रसिकांनी पहाटेपासूनच रांग लावली होती. 
 
रिलीजपूर्वी कर्नाटकातही "बाहुबली 2"ला होता विरोध
सिनेमामध्ये कटप्पाची भूमिका साकारणारे सत्यराज यांनी केलेल्या विधानामुळे सिनेमाच्या रिलीजला कर्नाटकात तीव्र विरोध दर्शवण्यात आला होता.  
 
2008 मध्ये  तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमधील कावेरी नदी पाणी वाटप संघर्षादरम्यान कर्नाटकातील आंदोलनकर्त्याविरोधात सत्यराज यांनी विधान केल्याचे आरोप करण्यात आला. या आंदोलनादरम्यान सत्यराज यांनी कन्नडिगांचा "कुत्रे" असा उल्लेख केला होता. त्यामुळे  "जोपर्यंत सत्यराज माफी मागत नाहीत, तोपर्यंत बाहुबली 2 सिनेमा कर्नाटकमध्ये रिलीज होऊ देणार नाही", अशी आक्रमक भूमिका कर्नाटकवासियांनी घेतली होती. अखेर सत्यराज यांनी माफी मागितल्यानंतर कन्नडवादी लोकांनी आपला विरोध मागे घेतला. 
 
दरम्यान, रिलीजपूर्वी हा सिनेमा कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे चर्चेत होताच. त्यामुळे सिनेमाबाबत सिनेरसिकांमध्ये आणखीनच उत्सुकता निर्माण झाली.