Join us

केवळ नाना स्टाईलसाठी...!

By admin | Updated: February 28, 2015 02:02 IST

मुंबई पोलीस दलात एन्काउंटर स्पेशालिस्ट असलेले पोलीस अधिकारी, गँगस्टर्स आणि राजकारण्यांच्या संगनमतावर आधारलेला अब तक छप्पन हा चित्रपट

मुंबई पोलीस दलात एन्काउंटर स्पेशालिस्ट असलेले पोलीस अधिकारी, गँगस्टर्स आणि राजकारण्यांच्या संगनमतावर आधारलेला अब तक छप्पन हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. नाना पाटेकरच्या अभिनयाची तेव्हा खूप तारीफ झाली होती. आता त्याचा सिक्वल ‘अब तक छप्पन २’ प्रदर्शित झाला आहे. मात्र नाना असला तरी त्याच्या पहिल्या अब तक... च्या तुलनेत या चित्रपटाने पुरते निराश केले आहे.हाही चित्रपट साहजिकच साधू आगाशे (नाना पाटेकर) भोवती फिरतो. अनेक प्रकरणांत हात असल्याने साधूची चौकशी सुरू आहे. त्यामुळे सिस्टीमला कंटाळलेला साधू नाराज होऊन गोव्यातल्या आपल्या गावी राहायला जातो. पत्नीच्या निधनामुळे मुलाची जबाबदारीही तो आनंदाने पार पाडत असतो. एकीकडे मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब झाल्याच्या बातम्या सातत्याने येत असतात. त्यामुळे ही प्रतिमा सुधारण्यासाठी एका वरिष्ठ पोलिसांच्या सल्ल्यावरून गृहमंत्री जनार्दन जहागीरदार (विक्रम गोखले) साधूला पोलीस दलात परत बोलावतात. त्याला एन्काउंटर विभागाच्या एका तुकडीचा प्रमुख केले जाते. ही तुकडी वेगाने अंडरवर्ल्डच्या विरोधात आपली कारवाई सुरू करते. या सगळ्याची माहिती परदेशात बसलेल्या अंडरवर्ल्ड डॉनपर्यंत पोहोचते. त्याचा बदला म्हणून साधूच्या मुलाची हत्या केली जाते. यामुळे साधू खचतो. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचीही हत्या होते. हत्येमागे मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेल्या गृहमंत्र्यांचा हात असल्याचे साधूला कळते. या कटात गृहमंत्री साधूचाही वापर करतात. हे सगळे समजल्यावर साधू पेटून उठतो आणि गृहमंत्र्याचा बदला घेतो. उणिवा - चित्रपट उणिवांनी भरलेला आहे. दहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘अब तक छप्पन’ चित्रपटाने जेवढा प्रभाव पाडला होता त्याच्या जवळपासही हा सिक्वल जात नाही. अनुभव नसताना चित्रपट दिग्दर्शित केलेला एजाज गुलाब यास कारणीभूत आहे. अनेक स्तरांवर हा चित्रपट कमकुवत ठरलेला आहे. दहा वर्षांत तांत्रिकदृष्ट्या हिंदी चित्रपटात खूप मोठी सुधारणा झाली आहे याची जाणीव दिग्दर्शकाला नसल्याचे चित्रपट पाहताना जाणवते. वास्तवतेशी काही संबंध नसलेल्या ऐकीव गोष्टींवर चित्रपटात भर देण्यात आला आहे. कथेपासून पटकथेपर्यंत चित्रपट दिशाहीन तर ठरतोच. पण प्रत्येक दृश्य आधी पाहिल्यासारखे वाटते. चित्रपटातील एन्काउंटर टीम, अंडरवर्ल्ड टीम हास्यास्पद वाटते. त्यांचा आजच्या काळाशी काहीच संबंध नाही. कलाकारांबाबतीत बोलायचे झाल्यास मुख्य भूमिकेतल्या नाना पाटेकरने पुरते निराश केले आहे. अशा प्रकारच्या भूमिका आणि अभिनय नानाने याआधी अनेकदा केला आहे. या चित्रपटातही तेच केल्याने नानाकडून नवे काही बघायला मिळत नाही. मुंबई पोलिसांचे एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणवणारे पोलीस हिरोगिरी करणारे कपडे वापरणार असतील तर त्याला काय म्हणावे? कोणाचा मुलगा वारला तरी तो त्याच कपड्याने वावरतोय असा चमत्कार फक्त नानाच करू जाणे. तर इतर कलाकारांनीही निराशाच केली आहे. दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, मोहन आगाशे, आशुतोष राणा, गुल पनाग हे सगळे या चित्रपटात का आहेत तेच कळत नाही. दिग्दर्शक एजाजला दिग्दर्शन कशाशी खातात ते शिकण्याची खूप मोठी गरज आहे.वैशिष्ट्ये - ज्यांना नानाची स्टाईल पसंत आहे त्यांना हा चित्रपट खूप आवडेल.