Join us  

केवळ ‘अल्पविराम’घेतला होता

By admin | Published: August 20, 2016 2:47 AM

पल्लवी जोशीने काही महिन्यांपूर्वी ‘मेरी आवाज ही पहचान है’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे पल्लवी कित्येक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतली.

पल्लवी जोशीने काही महिन्यांपूर्वी ‘मेरी आवाज ही पहचान है’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेद्वारे पल्लवी कित्येक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतली. आजच्या मालिका आणि पूर्वीच्या मालिका यांबाबत तिने ‘सीएनएक्स’सोबत दिलखुलास गप्पा मारल्या. सध्या तुझा जीएसटीचा व्हिडीओ चांगलाच गाजत आहे. या व्हिडीओची कल्पना तुला कशी सुचली?-आपण समाजाचा एक भाग असून समाजासाठी आपले काही देणे लागते असे माझे आणि माझे पती विवेक अग्निहोत्री यांचे म्हणणे आहे. एक कलाकार म्हणून आपण समाजासाठी काय करू शकतो, असा विचार कित्येक दिवस सुरू होता. त्यातूनच जीएसटीविषयी खूप कमी लोकांना माहिती होती. जीएसटी ही संकल्पना आपण लोकांना सोप्यातल्या सोप्या भाषेत समजवावी, असे आम्ही ठरविले. या व्हिडीओची संकल्पना ही विवेक आणि त्याच्या मित्राची आहे. ती संकल्पना खूपच चांगल्या पद्धतीने लिहिण्यात आली. ती वाचताच आपण लगेचच व्हिडीओचे चित्रीकरण करू या, असे मी विवेकला सुचवले.

लेखकांसाठी तुम्ही काही उपक्रम आखणार आहात, त्याविषयी काय सांगशील?-चांगल्या कथा, चांगल्या गोष्टी लिहिणारे अनेक जण आहेत; पण त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही. आपल्या लहानपणी आपली आई, आपली आजी आपल्याला गोष्ट सांगून झोपवायची; पण आता गोष्ट सांगणे ही गोष्टच इतिहासजमा झालेली आहे. काही जण उत्कृष्ट कथा तर लिहितात; पण त्याचसोबत त्यांची गोष्ट सांगण्याची पद्धतही खूपच चांगली असते. यासाठीच चांगल्या लेखकांसाठी ‘टेलिंग टेल’ या आमच्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही आता काही कार्यक्रम आयोजित करणार आहोत. या कार्यक्रमात आम्ही ज्यांना-ज्यांना आपली कथा लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, त्या लोकांना आमंत्रित करणार आहोत. या कथा ऐकण्यासाठी आमच्या इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणीही येणार आहेत. याद्वारे काही चांगल्या कथा आम्ही लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही चित्रपटासाठी, मालिकेसाठी कथा ही सगळ्यात महत्त्वाची असते; पण आमच्या इंडस्ट्रीमध्ये कथा लिहिणाऱ्या व्यक्तीला सगळ्यात कमी मानधन मिळते, ही अतिशय वाईट गोष्ट आहे.

इतक्या वर्षांनी मालिकेत पुन्हा काम करण्याचा विचार कसा केला; आणि तुझा पुन्हा मालिकेत काम करण्याचा अनुभव कसा होता? -‘मेरी आवाज ही पहचान है’ ही मालिका केवळ काहीच भागांची असल्याने मी तिचा भाग व्हायचे ठरवले. पण, आजच्या मालिका, चित्रीकरणाची पद्धत सगळे काही बदललेले आहे. १५-२० वर्षांपूर्वी अनेक निर्माते मालिकांचे चित्रीकरण करण्याआधी वर्कशॉप घेत असत. तसेच, अनेक बारीकबारीक गोष्टीही प्रत्येक कलाकाराला समजावून सांगितल्या जात असत. पण, आता कोणालाच या गोष्टींसाठी वेळ नाही. त्या वेळी मालिकाही खूप कमी भागांच्या असायच्या. त्यामुळे मालिकेची संपूर्ण कथा, व्यक्तिरेखा शेवटपर्यंत मालिकेत कशा प्रकारे दाखविली जाणार, याची आम्हा कलाकारांना कल्पना असायची. आज खूप गोष्टी बदलल्या आहेत; पण तरीही माझा काम करण्याचा अनुभव वाईट होता, असे मी कधीच म्हणणार नाही. मी मालिकेत काम करीत नसले, तरी दरम्यानच्या काळात मी मराठी मालिकांची निर्मिती केली. तसेच, ‘सारेगमपा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यामुळे हा बदललेला पडदा माझ्यासाठी तितकासा नवीन नाहीये.

तू अतिशय लहान वयापासून काम करीत आहेस. तुला बालकलाकार म्हणून जितकी लोकप्रियता मिळाली, त्यापेक्षाही कित्येक जास्त लोकप्रियता तुला नंतरच्या काळात मिळाली. पण, बालकलाकाराला भविष्यात यश न मिळाल्यास त्याचा त्याच्याआयुष्यावर काही परिणाम होतो, असे तुला वाटते का?-मी लहान वयापासून जरी काम करीत असले, तरी नेहमीच माझ्या कामासोबत अभ्यासाकडेही लक्ष दिले. मी आणि अलंकार आमच्या दोघांच्याही अभ्यासाकडे आमच्या पालकांचे बारीक लक्ष असायचे. अलंकार तर त्या वेळी स्टार होता; पण नंतरच्या काळात त्याला तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. पण, तो खचला नाही. त्याने इंडस्ट्रीच सोडली. आज तो व्यवसाय करीत असून, त्याच्या क्षेत्रात त्याने चांगलेच नाव कमावले आहे. अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येते. अनेक बालकलाकारांच्या बाबतीत ही गोष्ट घडते. अशा वेळी खचून न जाणे, हेच महत्त्वाचे असते.

तुझा आवाज खूप चांगला आहे. तू ‘बुद्धा इन ट्रॅफिक जॅम’ या चित्रपटात गाणेदेखील गायले होते. तू गायनात करिअर करण्याचा कधी विचार का नाही केलास?-माझ्या आईने मला लहानपणापासूनच गाणे शिकवायला सुरुवात केली होती. माझा आवाज खरंच खूप चांगला आहे. पण, मी माझ्या गायनावर कधीच मेहनत घेतली नाही, या गोष्टीची मला कल्पना आहे. कारण, मी गायिका होण्याचा कधी विचारच केला नाही.

- prajakta.chitnis@lokmat.com