Join us

ऑनलाइन व्हिडीओ कमाईत टीव्हीलाही मागे टाकणार; २०२९ पर्यंत ८.६ अब्ज डॉलरचा महसूल मिळण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:53 IST

२०२९ पर्यंत देशातील मनोरंजनाच्या बाजारातील उलाढाल १७ अब्ज डॉलरच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : बदलत्या तंत्रज्ञानामुळे मनोरंजनाची दुनिया वेगाने बदलत आहे. पारंपरिक टीव्ही, सिनेमा यांना नवे आणि प्रेक्षकांच्या सोयीचे पर्याय समोर आले आहेत. या बदलांमुळे २०२९ पर्यंत देशातील मनोरंजनाच्या बाजारातील उलाढाल १७ अब्ज डॉलरच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. यात ऑनलाइन व्हिडीओतून मिळणारा महसुलाचा वाटा सर्वाधिक ८.६ अब्ज डॉलर इतका असेल, असा अंदाज मीडिया पार्टनर्स आशिया (एमपीए), आयपी हाउस आणि भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय) यांच्या संयुक्त अहवालात वर्तविला आहे.

यात म्हटले की, टेलिव्हिजनच्या महसूलात पुढील पाच वर्षात घट होईल तरीही ६.८ अब्ज डॉलरसह तो दुसऱ्या स्थानावर असेल. चित्रपटांची कमाई या काळात १.९ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचू शकते. सध्या उद्योगात हायब्रिड रिलीज धोरण स्वीकारण्यात आलेले आहे. मल्टिप्लेक्स पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले जात आहेत. उद्योगाचा कल पारंपरिक माध्यमाकडून डिजिटलकडे वळण्याकडे दिसतो. मल्टी-स्क्रीनचे अस्तित्व भविष्यामध्येही कायम राहू शकते, असे अहवालात म्हटले आहे.

झपाट्याने बदलत आहेत प्रेक्षकांच्या सवयी२०२९ पर्यंत भारताच्या स्क्रीन अर्थव्यवस्थेच्या कमाईत प्रत्येक दोन डॉलरपैकी एक डॉलर ऑनलाइन व्हिडीओमधून येईल. हे माध्यम पारंपरिक टेलिव्हिजनला मागे टाकण्याच्या वाटेवर आहे. यामुळे देशातील नागरिकांच्या मनोरंजनाच्या सवयीमध्ये आमूलाग्र बदल होतील. अहवालात अंदाज वर्तवण्यात आला आहे की, २०२९ पर्यंत देशातील एकूण मनोरंजन उद्योगातील गुंतवणूक ७.५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल. देशात ऑनलाइन व्हिडीओंच्या निर्मितीवर होणारा खर्च पहिल्यांदाच टेलिव्हिजन कंटेटसाठी  होणाऱ्या खर्चाच्या बरोबरीने होईल. 

ऑनलाइन व्हिडीओ क्षेत्राचा वाटा ४३ टक्क्यांपर्यंत२०१९ मध्ये ऑनलाइन व्हिडीओ क्षेत्रातील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या केवळ १५ टक्के होती. २०२९ पर्यंत या क्षेत्राचा हिस्सा वाढून ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. यात वार्षिक ८.५ टक्के इतक्या गतीने वाढीची शक्यता आहे. आशियात सर्वांत मोठ्या व्हिडीओ सामग्री बाजारांपैकी एक असलेल्या भारतातली गुंतवणूक २०२४ मध्ये ५.८ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. ही प्रमाण २०१९ च्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. ग्राहकांच्या पाहण्याच्या सवयित बदल झाल्याने टीव्हीचे योगदान ६७ टक्क्यांवरून कमी होऊन ४३ टक्क्यांवर आले आहे.