Join us  

बापरे..! मराठी मालिकेच्या सेटवर दोन अभिनेत्रींमध्ये जोरदार जुंपली, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:51 AM

मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील नवा गडी नवं राज्य (Nava Gadi Nava Rajya) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील रमा, राघव, आनंदी आणि चिंगी घराघरात पोहचले आहेत. वेगळे कथानक असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. या मालिकेत रमाच्या भूमिकेत अनिता दाते (Anita Date) आणि आनंदीच्या भूमिकेत पल्लवी पाटील (Pallavi Patil) आहे. तर अभिनेता कश्यप परुळेकर (Kashyap Parulekar) राघवच्या भूमिकेत पाहायला मिळतो आहे. दरम्यान या मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत अनिता दाते आणि पल्लवी पाटील मारामारी करताना दिसत आहेत. 

कश्यप परुळेकरने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अनिता दाते आणि पल्लवी पाटील मारामारी करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर त्याने लिहिले की, झालं एखाद्या दिवशी एखाद्याचं सर्वात आधी पॅकअप... म्हणून ही अशी अडवणूक करायची.

खरेतर या व्हिडीओत त्या दोघी खरोखर मारामारी करत नसून मस्ती करत आहेत. या व्हिडीओला फक्त चाहत्यांचीच नाही तर सेलिब्रेटींचीही पसंती मिळत आहे. अभिनेत्री श्रुती मराठेला देखील वाटले की, त्या दोघी खरोखर भांडत आहेत. तिने कमेंटमध्ये लिहिले की, एक मिनिटं असं वाटलं की अनिता आणि पल्लवी भांडत आहेत. लगेच सेटवर यायला निघाले होते मी.

नवा गडी नवं राज्य मालिकेत चिंगी राघववर रागवून रमाच्या आई वडिलांकडे राहायला गेली होती. घर सोडून गेल्यानंतर चिंगीचा वाढदिवस असतो. ती घरात नाही त्यामुळे आधीच राघव चिंतेत असतो. त्यात तिला घरी परत आणण्यासाठी आनंदी धडपडत असते. दरम्यान वाढदिवसाला वेश बदलून चिंगी घरात येते पण घरात सगळ्यांना समजते की ही चिंगी आहे. तिला आवडते म्हणून आनंदीने पाणीपुरी बनवली होती. त्यावर चिंगी ताव मारते आणि स्वतःचा वाढदिवस साजरा करते. त्यानंतर तिचा रुसवा निघून जातो आणि ती पुन्हा राघवकडे राहायला येते. दरम्यान घरात राघवची बहिण आणि आनंदीची बहिण माई यांच्यात वाद होतो आणि माई रागाने तिथून निघून जाते. आता आनंदी तिचा गैरसमज कशी दूर करेल हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :झी मराठीअनिता दातेपल्लवी पाटील