Join us

‘शिणेमा’ नव्हे, ‘गेम’च वाजला

By admin | Updated: September 12, 2015 03:58 IST

निव्वळ मनोरंजन आणि मनोरंजन हा हेतू ठेवून चित्रपट बनवायचा ही कल्पना चांगली असली, तरी त्यात मसाला भरताना त्याला योग्य चव आहे की नाही, याची खातरजमा करणे महत्त्वाचे ठरते.

- राज चिंचणकर (मराठी चित्रपट परिक्षण)निव्वळ मनोरंजन आणि मनोरंजन हा हेतू ठेवून चित्रपट बनवायचा ही कल्पना चांगली असली, तरी त्यात मसाला भरताना त्याला योग्य चव आहे की नाही, याची खातरजमा करणे महत्त्वाचे ठरते. पुन्हा वरून त्याला विनोदाची फोडणी देताना पुरेसे गांभीर्य असणेही गरजेचे असते. कारण विनोद हाही गांभीर्याने करण्याचा प्रकार आहे आणि त्याने ठरावीक पातळी सोडली, तर त्या विनोदाचे हसे व्हायला वेळ लागत नाही. ‘वाजलाच पाहिजे! - गेम की शिणेमा’ हा चित्रपट ही पातळी सांभाळण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. परिणामी, हा ‘शिणेमा’ नव्हे, तर त्याचा ‘गेम’च वाजल्याचे स्पष्ट होत जाते.चित्रपटसृष्टीत स्थिरस्थावर होण्यासाठी आलेला स्ट्रगलर दिग्दर्शक यश आणि स्ट्रगलर अभिनेता राज एका निर्मात्याच्या शोधात असतात आणि एक दिवस ते ‘भाऊ दमदार’ नामक निर्मात्याकडे येऊन पोहोचतात. चित्रपटासाठी देखणी हीरोइन मिळवून देण्याची अट भाऊ त्यांना घालतात. परिणामी, राज हीरोइनच्या शोधात निघतो; तर यश भाऊंकडे फिल्डिंग लावून बसतो. अचानक राजची गाठ सुप्रिया या तरुणीशी पडते. तिलाही चित्रपटात चमकायचे असल्याने राज तिला घेऊन भाऊंकडे येतो. सुप्रियाला पाहून भाऊ पाघळतात आणि पैशांची अख्खी गोण ते या मंडळीसमोर रिती करतात. निर्माता या नात्याने भाऊ या चित्रपटाची सगळीच सूत्रे हळूहळू आपल्या हाती घेतात आणि त्यातून जो काही सावळागोंधळ उडतो त्याचे सादरीकरण म्हणजे हा चित्रपट आहे.वास्तविक, या ‘शिणेमा’ची कथा बरी आहे; मात्र ती फुलवताना तिची केलेली हाताळणी वाह्यातपणाकडे झुकली आहे. बाळ-अमोल यांची कथा, पटकथा व संवाद ही त्रिसूत्री बळेबळेच विनोदनिर्मिती करण्याचा अट्टहास करते. ओढूनताणून आणलेल्या विनोदाचा भडिमार आणि द्वयर्थी संवाद, हाच प्रेक्षक खेचण्याचा एकमेव मार्ग असल्याप्रमाणे एकूणच ही सगळी भट्टी जमवून आणल्याचे जाणवत राहते. दिग्दर्शक आर.विराज यांनी कागदावरची ही कथा जशासतशी सादर करण्याचा मार्ग अवलंबत विनोदाचा सडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. यातले काही प्रसंग तर हास्यास्पद आहेत आणि चित्रपट हलक्याफुलक्या विनोदाच्या अंगाने जाण्याऐवजी उथळपणाकडेच अधिक वळला आहे.चित्रपटातल्या ‘भाऊ दमदार’ या प्रमुख भूमिकेत भाऊ कदम आहेत; परंतु त्यांच्यासारखा विनोदाचा अनुभवी आणि हुकमी एक्का हाती असताना त्यांना चित्रपटात जे काही करायला लावले आहे ते ‘दिव्य’च म्हणावे लागेल. परिणामी, यातला दमदारपणा हरवला आहे. विनोदाच्या नावाखाली वाट्टेल ते उद्योग करणारे भाऊ कदम पाहण्याची वेळ या चित्रपटातून येते. वास्तविक, त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर चित्रपटकर्त्यांना काही टिप्स दिल्या असत्या, तर हा ‘शिणेमा’ वेगळा मार्ग धरू शकला असता. भाऊंच्या सोबत राजेश भोसले (यश), चिन्मय उदगीरकर (राज), गिरिजा जोशी (सुप्रिया), आरती सोळंकी (चटक चांदणी) आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. त्यांनी आपापल्या भूमिकांना न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी ‘आड्यातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार’ अशी या मंडळींची एकूणच गत झाली आहे. डोके पार बाजूला काढून ठेवणे, ही या चित्रपटाची पहिली अट असली तरी काही वेळाने डोळे आणि कान बधिर झाल्याची लक्षणे अनुभवणे, ही या चित्रपटाची दुसरी पायरी ठरण्याची शक्यताही आहे.