Join us  

Birthday special; 'ड्रग्जच्या आहारी गेलोच नव्हतो', यो यो हनी सिंगने सांगितलं इंडस्ट्रीतून बाहेर जाण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 1:29 PM

संगीत चाहत्यांना आपल्या एकापेक्षा एक गाण्यांनी वेड लावणारा व थिरकायला भाग पाडणाऱ्या हनी सिंगने अचानक सिनेसृष्टीतून एक्झिट घेतली होती.

मुंबई- सिनेसृष्टीतून व संगीत क्षेत्रातून मोठ्या कालावधीसाठी बाहेर गेलेल्या रॅपर-गायक हनी सिंगने त्याच्या सिनेसृष्टीतून बाहेर जाण्याचं कारण सांगितलं आहे. संगीत चाहत्यांना आपल्या एकापेक्षा एक गाण्यांनी वेड लावणारा व थिरकायला भाग पाडणाऱ्या हनी सिंगने अचानक सिनेसृष्टीतून एक्झिट घेतली होती. हनी सिंगने अचानक संगीत क्षेत्रातून शांतपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर अनेक अफवांना उधाण आलं होतं. हनी सिंग ड्रग्जच्या आहारी गेला आहे, अशा अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या.  हनी सिंगला ड्रग्ज घ्यायची अती जास्त सवय लागल्याने तो पुर्नवसन केंद्रात असल्याचंही बोललं गेलं. यावर हनी सिंगने कुठलीही प्रतिक्रिया आधी न दिल्याने चर्चांची मालिका वाढतच होती. पण या सगळ्या चर्चांना आता स्वतः हनी सिंगने पूर्णविराम दिला आहे. 

आयुष्यातील त्या काळ्या दिवसांबद्दल हनी सिंगने खुलासा केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इतके महिने काय करत होतो? याबद्दलची सगळी उत्तरं हनी सिंगने दिली. बायपोलर डिसॉर्डर हा आजार झाल्याने हनी सिंग 18 महिने संगीतक्षेत्रातून बाहेर होता. 'गेल्या 18 महिन्याच काय घडलं यावर मी पहिल्यांदा भाष्य करतो आहे. माझ्याबद्दल काय घडलं याबद्दल चाहत्यांना माहिती मिळावी, असं मला वाटतं. गेल्या 18 महिन्यांचा काळ माझ्या आयुष्यातील सगळ्यात काळा काळ होता. त्याबद्दल मी कधीही बोललो नाही. मी खूप ड्रग्ज घेतो म्हणून पुर्नवसन केंद्रात पाठविलं आहे, अशा चर्चा झाल्याचं मला माहिती आहे. पण त्यात काही तथ्य नाही. मला झालेल्या आजारावर उपचार करण्यासाठी मी नोएडामध्ये होतो. 18 महिन्याच्या काळात मी चार डॉक्टर्स बदलले. औषधांचा काहीही उपयोग होत नव्हता. माझ्याबरोबर वेगवेगळ्या गोष्टी घडत होत्या. त्यामुळे मद्यपानाची सवय लागली. त्यामुळे त्यावरही उपचार करावे लागले. माझ्या करिअरचा शेवट होतो आहे, अशीही भावना मनात आली होती'. असं हनी सिंगने म्हंटलं. 

करिअरच्या सुरूवातीलाच हनी सिंगवर स्वतःला खोलीत कोंडून घेण्याची वेळ आली होती. कमी वयात त्याला बायपोलर डिसॉर्डरने ग्रासलं. 'आजाराची मला खूप भीती वाटू लागली. यामध्ये एक वर्षाचा काळ गेला पण तरीही औषधांचा परिणाम होत नव्हता. तीन डॉक्टर बदलल्या नंतर दिल्लीतील चौथ्या डॉक्टरांकडून उपचार सुरू केले. त्याचा थोडा परिणाम दिसून लागला. आयुष्यभर मला असंच अंधारात रहावं लागेल, असं मला वाटलं होतं. मी सगळ्यांशी संपर्क तोडला होता. खोलीबाहेरही येत नव्हतो. अनेक महिने केसही कापले नव्हते, दाढीही ठेवली होती. जी व्यक्ती वीस हजार लोकांसमोर परफॉर्म करायची त्याला तीन-चार जणांसमोर यायलाही भीती वाटू लागली. बायपोलर डिसॉर्डरने मला हेच दिलं, असं त्याने म्हंटलं. दरम्यान, हनी सिंगची प्रकृती आता उत्तम असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागन करतो आहे.