Join us

कृष्णा आणि कश्मीरा शाहच्या घरी नवे पाहुणे, जुळ्यांचा जन्म

By admin | Updated: June 30, 2017 16:33 IST

कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह आई - बाबा झाले असून त्यांच्या घरी दोन नव्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - कृष्णा अभिषेक सध्या चांगलाच चर्चेत आहे. कपिल शर्माचा वाद कृष्णासाठी फायद्याचा ठरला असून त्याचं नशीब चांगलंच फळफळलं आहे. कृष्णा अभिषेकचा नवा टीव्ही शो "ड्रामा कंपनी" लवकरच ऑन एअर होणार आहे. पण फक्त करिअरच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही कृष्णा आनंदी आहे. कारण त्याच्या घरी दोन जुळ्यांचा जन्म झाला आहे. कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह आई - बाबा झाले असून त्यांच्या घरी दोन नव्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोड्यांमधील एक जोडी म्हणून या दोघांचं नाव घेतलं जातं. 2013 मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले होते.
 
(सैराट फेम तानाजी झळकणार हिंदी शोमध्ये)
 
सहा आठवड्यांपूर्वीच कश्मीरा शाहने सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. दोन्ही बाळांना सध्या रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. सध्या कृष्णा आणि कश्मीरा जास्तीत जास्त वेळ रुग्णालयात घालवत असून लवकरच त्यांना घरी आणणार आहेत.
 
आई - बाबा होऊन सहा आठवडे झाले तरी दोघांनी ही बातमी लपवून ठेवल्याने थोडं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अशाचप्रकारे 2013 रोजी जेव्हा दोघांनी लग्न केलं होतं, तेव्हाही त्यांनी कोणाला ही बातमी कळू नये याची खात्री केली होती. 2015 मध्ये दोघांनीही आम्ही लग्न केल्याचं जाहीर केलं होतं. आपल्याला कोणताही मोठा कार्यक्रम करायचा नसल्याने आपण ही गोष्ट लपवून ठेवल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 
 
मनोरंजन विश्वात सरोगसीच्या माध्यमातून आई - वडिल होणं आता काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. आता तर तो एक ट्रेण्डच सुरु झाला आहे. याआधी करण जोहर, शाहरुख खान, आमीर खान, सोहेल खान आणि तुषार कपूर सरोगसीच्या माध्यमातून पालक झाले आहेत.
 
दुसरीकडे कृष्णाच्या टीव्ही शो  "ड्रामा कंपनी"चाही टीझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरमध्ये बॉलिवूड डिस्को डान्सर मिथून चक्रवर्ती यांच्यासोबत शोमधील सगळे कलाकार दिसत आहेत. या शोमध्ये कृष्णा, अली असगर, संकेत भोसले, सुगंधा मिश्रा आणि सुदेश लेहरी यांच्यासोबत सैराट फेम तानाजी गलगुंडेदेखील झळकणार आहे.